अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर - Anticipatory Bail application of Vikram Gokhale Rejected by Pune Court | Politics Marathi News - Sarkarnama

अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

विक्रम गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी या तिघांवर मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या विरोधात जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.

पुणे  : मुळशी तालुक्यातील डोंगरगाव होतले येतील जमिनींच्या प्रकरणात  ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांच्या न्यायालयात या जामिन अर्जाची सुनावणी झाली. न्यायालयाने यापूर्वी त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र अंतिम निकाल देताना गोखले यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला.

गोखले यांच्यासह सुजाता फार्म लि या कंपनीचे संचालक जयंत म्हाळगी व सुजाता म्हाळगी या तिघांवर मुळशी तालुक्यातील डोंगरगाव व होतले येथील विविध जमीन गटांची बेकायदेशीर विक्री केल्याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांच्या विरोधात जयंत प्रभाकर बहिरट (वय 57, रा. कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात १४ गुंतवणूकदारांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर न्यायालयाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता. 

या प्रकरणातील संशयित आरोपींनी मुळशीतील 'गिरीवन' नावाचा प्रकल्प सरकारमान्य आहे असे भासवले. त्या आधारे ग्राहकांना आकर्षित केले व तक्रारदार यांच्यासह १४ जणांची एक कोटी रुपयांची फसवणूक झाली, अशा आशयाची ही तक्रार आहे. गोखले यांनी अॅड. ॠषीकेश गानू आणि अॅड. उपेंद्र खरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मार्चमध्ये यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.

विक्रम गोखले कंपनीचे अध्यक्ष असल्याची बाब कंपनीच्या मेमोरेंडम आॅफ असोसिएशनमध्ये दिसून येत नाही. तसेच त्यांची ग्राहकांच्या खरेदीखतावर स्वाक्षरी नाही. तसेच त्यांनी गुंतवणूकदारांकडून कुठलाही मोबदला स्वीकारला नाही. एफआयआरमधील कोणत्याही आरोपांशी गोखले यांचा संबंध नाही, असा युक्तिवाद गोखले यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.  या जामीन अर्जाला सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला. 

गोखले हे संबंधित कंपनीचे अध्यक्ष असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली रक्कम मोठी आहे. गोखले यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे, त्यामुळे पुढील तपासासाठी त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद अॅड. सप्रे यांनी केला.

त्यानंतर न्यायालयाने गोखले यांचा अर्ज फेटाळून लावला.  दरम्यान, सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अर्ज करण्यास मुदत मिळावी, अशी विनंती गोखले यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने या निकालास १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.
Edited By - Amit Golwalkar 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख