थोपटेंनी राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाला कॉंग्रेसमध्ये नेऊन उपसभापती केले  - Ananta Darwatkar elected as Deputy sabhapati of Velhe Panchayat Samiti | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

थोपटेंनी राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाला कॉंग्रेसमध्ये नेऊन उपसभापती केले 

मनोज कुंभार 
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

आमदार संग्राम थोपटे यांनी राजकीय खेळी केली.

वेल्हे (जि. पुणे)  : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांना विधानसभा निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळण्यासाठी, तसेच वेल्हे पंचायत समितीचे कॉंग्रेसचे सदस्य नाराज होऊ नयेत, यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी राजकीय खेळी केली. दारवटकर यांचे पुत्र अनंता यांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करायला लावून उपसभापतिपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली. आमदारांच्या या खेळीने दारवटकर यांना दिलेला शब्दही पाळला गेला आणि वेल्ह्यातील आपला गटही नाराज होणार नाही, याची काळजी घेतली गेली. 

अपक्ष म्हणून निवडून आलेले अनंता दारवटकर यांनी आज (ता. 22 जानेवारी) आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्ष सदस्यत्वाचा फॉर्म भरून कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर उपसभापतिपदासाठी अनंता दारवटकर यांनी अर्ज दाखल केला. दारवटकर यांच्या अर्जावर पंचायत समिती सदस्या संगीता जेधे व सभापती दिनकर सरपाले यांच्या सूचक म्हणून सह्या आहेत. त्यानंतर प्रांतधिकारी राजेंद्र जाधव यांनी उपसभापतिपदी अनंता दारवटकर यांचे नाव घोषित केले. 

वेल्हे पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या निवड प्रक्रियेचे काम तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी काम पाहिले. 

आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांची मदत झाली होती. त्या वेळी थोपटे यांनी दारवटकर यांचे चिरंजीव पंचायत समिती सदस्य अनंता यांना सभापतिपद देण्याचा शब्द दिला होता. पण, कॉंग्रेसची एकहाती सत्ता असलेल्या पंचायत समिती सदस्यांनी आमदारांचा आदेश झुगारुन सभापतिपदी कॉंग्रेसचेच दिनकर सरपाले यांना विराजमान केले होते. या दरम्यान आमदार व पंचायत समिती सदस्यांमध्ये अंतर्गत वादही झाला होता. 

दरम्यान, उपसभापती सीमा राऊत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने उपसभापतिपद रिक्त झाले होते. याबाबत "सरकारनामा'मध्ये आमदार संग्राम थोपटे विधानसभेवेळी दिलेला शब्द पाळणार का? असे वृत्त प्रसिद्ध होताच थोपटे यांनी पंचायत समिती सदस्य व तालुका कॉंग्रेस कार्यकारिणीची तातडीची बैठक गुरुवारी (ता.21 जानेवारी) राजगड कारखान्याच्या सभागृहात बोलाविली होती. 

त्या बैठकीत अनंता दारवटकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला; तरच शब्द पाळला जाईल, यावर एकमत झाले. त्यानुसार आज (ता. 22 जानेवारी) सकाळी आमदार थोपटे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांनी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर अनंता दारवटकर यांच्या गळ्यात उपसभापतिपदाची माळ घातली. 

या वेळी सभापती दिनकर सरपाले, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, कॉंगेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप बाठे, राजगड कारखान्याचे संचालक संदीप नगिने, शोभा जाधव, पंचायत समिती सदस्या सीमा राऊत, संगीता जेधे, माजी उपसभापती चंद्रकांत शेंडकर, नाना राऊत, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर, शिवाजी चोरघे, भाऊ दसवडकर, माजी तालुका अध्यक्ष दिलीप लोहकरे, संतोष मोरे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख