कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे अजित पवारांचे आदेश - Ajit Pawar took review of Corona Situation in Pune District | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाईचे अजित पवारांचे आदेश

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मार्च 2021

विधानभवन कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. 

पुणे : कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळीच दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विधानभवन कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाला आळा घालण्यासाठी पुणे शहरात ३१ मार्चपर्यंत नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत असे या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, आमदार  सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, डॉ. प्रदीप आवटे आदींसह वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला होते.

जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे, असे पवार यांनी बैठकीत सांगितले.

गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांशी संपर्क व समन्वय ठेवावा. गृह विलगीकरणातील बाधित अनेकदा नियम पाळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. अशांवर कठोर कारवाई करावी, असे आदेशही पवार यांनी यावेळी दिले. तसेच गृह विलगीकरणाला मान्यता देताना सर्व निकषांची पूर्तता होत असेल तरच परवानगी द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी पथकांची नेमणूक करावी. कुठेही गर्दी होता कामा नये. मास्क न वापरणा-यांवर वेळीच दंडात्मक कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी यंत्रणांना दिले.

बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले
रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी
शाळा- महाविद्यालय
३१ मार्चपर्यंत बंद
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट 
लग्न समारंभ आणि अंत्यविधी कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींची उपस्थिती
हॉटेल्स, दुकाने, बिअर बार रात्री दहा वाजेपर्यंत खुले
हाॅटेल्स-बार ५० टक्के क्षमतेने चालवण्याची मुभा
हाॅटेलबाहेर बसलेल्या ग्राहकांची संख्या बोर्डावर लावणे बंधनकारक
११ पर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी
शहरातील सर्व उद्याने बंद सायंकाळी ठेवणार
गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्लब हाऊस बंद ठेवणार
अभ्यासिका निम्म्या क्षमतेने चालू ठेवणार
विवाह सोहोळ्यांसाठी पोलिस परवानगी आवश्यक
नियमभंग दिसल्यास हाॅल सील करण्याची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई
रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी
शाळा- महाविद्यालय
 ३१ मार्चपर्यंत बंद
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट 
लग्न समारंभ आणि अंत्यविधी कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींची उपस्थिती
हॉटेल्स, दुकाने, बिअर बार रात्री दहा वाजेपर्यंत खुले
हाॅटेल्स-बार ५० टक्के क्षमतेने चालवण्याची मुभा
हाॅटेलबाहेर बसलेल्या ग्राहकांची संख्या बोर्डावर लावणे बंधनकारक
११ पर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी
शहरातील सर्व उद्याने बंद सायंकाळी ठेवणार
गृहनिर्माण सोसायट्यांमधील क्लब हाऊस बंद ठेवणार
अभ्यासिका निम्म्या क्षमतेने चालू ठेवणार
विवाह सोहोळ्यांसाठी पोलिस परवानगी आवश्यक
नियमभंग दिसल्यास हाॅल सील करण्याची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख