माजी आमदार पाटसकरांच्या घरांसाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला
Ajit Pawar took the initiative for the houses of former MLA Pataska

माजी आमदार पाटसकरांच्या घरांसाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला

पाटसकर यांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकीत माहिती घेऊन मार्ग काढला जाईल.

दौंड : जुनी माणसे फार मोठ्या मनाची होती. मोठ्या मनाची ही माणसे देशाचा विचार करणारी होती. अशा दिवंगत माजी आमदार जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या घराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकीत माहिती घेऊन मार्ग काढला जाईल, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. (Ajit Pawar took the initiative for the houses of former MLA Pataskar)

दौंड शहरातील एसटी स्टॅण्ड व उपजिल्हा रूग्णालयासाठी स्वतःची साडेसात एकर जागा सरकारला देणारे दौंड तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक तथा दिवंगत माजी आमदार जगन्नाथ तात्याबा पाटसकर मात्र शहरात भाड्याच्या खोलीत राहत होते. दौंड नगरपालिकेने त्यांना शहरात सव्वा गुंठे जागा देण्याचा ठराव केला होता. परंतु त्यांच्या हयातीत व त्यानंतरही विविध कारणे देत ती जागा देण्यात न आल्याच्या विषयास ‘सरकारनामा’ कडून वाचा फोडण्यात आली. त्याची दखल घेत राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत जागेसंबंधी प्रलंबित विषयाची माहिती दिली. 

अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे ज. ता. पाटसकर यांचे चिरंजीव हरिभाऊ पाटसकर यांच्याकडून माहिती जाणून घेतली व १९९२ पासून विषय प्रलंबित राहिल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले. तसेच, या बाबत शनिवारी (ता. २४ जुलै) पुणे येथे बैठक घेण्याचे संबंधितांना निर्देश दिले. त्यानुसार पुण्यातील विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचनेनुसार दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी व दौंड तहसीलदार कार्यालयातून या बैठकीची तयारी केली जात आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार हे वक्तशीरपणा आणि कठोर शिस्तीसाठी परिचित आहेत. परंतु दिवंगत पाटसकर यांच्या घराच्या प्रश्नाची माहिती घेताना त्यांचा संवेदनशील स्वभावाची प्रचिती पाटसकर कुटुंबीयांना आली.

दौंड येथील पाटसकर कुटुंबीयांची होणारी परवड पाहून बातमीदार रमेश वत्रे यांच्या पुढाकाराने दौंड येथे सरकारदरबारी करावयाच्या पाठपुराव्याकरिता एक सहविचार बैठक घेण्यात आली. बैठकीस दिवंगत माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे चिरंजीव तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात, हरिभाऊ पाटसकर यांच्यासह वैशाली नागवडे, अॅड. प्रशांत गिरमकर, विकास खळदकर, जयराम सुपेकर, अनील सोनवणे, तुषार सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in