....अन्‌ नारायण पाटील गटाचा जल्लोष क्षणात मावळला  - After the complaint of Sanjay Shinde's group, the selection process of Karmala Panchayat Samiti chairperson was postpone | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

....अन्‌ नारायण पाटील गटाचा जल्लोष क्षणात मावळला 

अण्णा काळे
गुरुवार, 1 जुलै 2021

हे सर्व जाणीवपूर्वक झाले का?

करमाळा (जि. सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड आज  (ता. 1 जुलै) होणार होती. मात्र, आमदार संजय शिंदे गटाचे पांडे गणातील पंचायत समिती सदस्य अॅड. राहुल सावंत यांनी सभापती निवडीची नोटीस वेळेत मिळाली नसल्याची तक्रार केली. त्याची दखल घेऊन तहसीलदार समीर माने ही निवड प्रक्रिया पुढे ढकलली असल्याचे जाहीर केले. सभापती निवडीची ही प्रक्रिया थांबल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. (After the complaint of Sanjay Shinde's group, the selection process of Karmala Panchayat Samiti chairperson was postpone)

पंचायत समितीवर शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांची सत्ता आहे. सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त सभापती पदासाठी ही निवड होणार होती. निवडणूक प्रक्रिया आज दुपारी सुरू झाल्यानंतर सभापतीपदासाठी अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यांचा अर्ज वैधही ठरला. त्यामुळे अतुल पाटील हे सभापती झाले म्हणून नारायण पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. फटाकेही फोडण्यात आले. मात्र, नारायण पाटील गटाचा हा आनंद औटघटकेचा ठरला आहे. कारण, ही निवडप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.

सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया आज (ता. 1 जुलै) पंचायत समितीच्या सभागृहात सुरू झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार समीर माने हे होते. दुपारी 2 वाजता सभापती निवडीची घोषणा करण्यासाठी बैठक सुरू झाली. त्यावेळी अॅड.राहुल सावंत यांचे म्हणणे ऐकून घेऊन तहसीलदारांनी सभा तहकूब करत ता. 9 जुलै रोजी ही निवड प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली.

ही वाचा  :बागल गटाची धुरा दिग्विजयच्या खांद्यावर

पंचायत समितीची सत्ता माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाकडे असून 10 सदस्यांपैकी 6 सदस्य पाटील गटाकडे आहेत. याशिवाय पंचायत समिती सदस्य जया जाधव, स्वाती जाधव, मंदाकिनी लकडे यांनीही पाटील गटाला आज उघडपणे पाठिंबा दिला आहे. 

करमाळा पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी काढण्यात आलेल्या नोटिसा वेळेत पोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना नेमकी त्यांना वेळेत नोटीस का पोचली नाही? याला जबाबदार कोण? हे सर्व जाणीवपूर्वक झाले का? या प्रश्नांची आज दिवसभर तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगली होती.
 
सावंत बंधूंनी वेळीच डाव ओळखावा : अतुल पाटील

सभापतिपदाच्या निवडीसंदर्भात गुरुवारी बैठक बोलावली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आमच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा केला. वेळ संपेपर्यंत एकही अर्ज न आल्याने शिवाय प्रशासनाकडून कसलीही कल्पना न दिल्यामुळे समर्थकांनी जल्लोष करणे सहाजिक होते. मुळातच शिंदे गटाची सभापतीपदापर्यंत मजल मारण्याची ताकद नसल्याने समोरासमोर न लढता पळवाट शोधून स्वतःच खोटं समाधान करून घेतले आहे.

तक्रारी अर्ज बुधवारी (ता. ३० जून) आलेला असतानाही आज निवड प्रक्रिया राबवत असताना तहसीलदार समीर माने यांनी कसलीही कल्पना अम्हाला दिली नाही, ही बाब गंभीर असून आम्ही याबाबत न्याय मागणार आहोत. तहसीलदारांनी पंचाची भूमिका पार पाडणे अपेक्षित होते. पण, तसे होताना दिसून आले नाही. बाजार समितीमध्ये सावंतांना पुढे करून जगतापांना मागे खेचण्याचा डाव यशस्वी झाला. आता पंचायत समितीतही असेच काहीतरी घडवण्याचा डाव आहे. आपण स्वतः शाबूत राहून दुसरे कसे बदनाम होतील, हे जाणूनबुजून कोणीतरी प्रयत्न करीत असल्याचे सावंत बंधूंनी ओळखले पाहिजे, असे पंचायत समिती सदस्य अतुल पाटील यांनी आवाहन केले. 

आमची तक्रार योग्यच; म्हणूनच प्रक्रिया थांबवली  ः  सावंत

नियमाप्रमाणे मला सात दिवस आधी नोटीस मिळणे गरजेचे होते. मात्र, मला ही नोटीस वेळेत मिळाली नाही; म्हणून मी 30 जूनलाच तहसीलदार, गटविकास अधिकारी, निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत आमचे नेते आमदार संजय शिंदे यांच्याशीही बोलणे झाले होते. त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊन तक्रार दिली आहे. आमची तक्रार योग्य होती; म्हणूनच ही प्रकिया थांबली, असे तक्रारदार आणि पंचाय समितीचे सदस्य अॅड. राहुल सावंत यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख