राष्ट्रवादीपुढील डोकेदुखी वाढणार : विरोधकांसोबत लढताना इच्छुकांना शांत करावे लागणार  - 638 nominations filed for 21 seats of Someshwar Co-operative Sugar Factory | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

राष्ट्रवादीपुढील डोकेदुखी वाढणार : विरोधकांसोबत लढताना इच्छुकांना शांत करावे लागणार 

संतोष शेंडकर 
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

भाजपने उशिरा मोट बांधली असली तरी त्यांना 21 जागांसाठी शेवटच्या दिवशी ऐन मोक्‍यावर 35 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात यश आले.

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : बारामतील तालुक्‍यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 जागांसाठी इच्छुकांचे तब्बल 638 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे विशेषतः राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढची डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये सोमेश्वरचे विद्यमान अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, प्रमोद काकडे, राजवर्धन शिंदे, दत्ताजी चव्हाण, दिलीप खैरे आदी दिग्गजांचा समावेश आहे. 

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. ता. 15 फेब्रुवारीपासून सुरवात झाली होती. मात्र, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा सलग तीन सुट्या निवडणूक प्राधिकरणाने लक्षात घेतल्या नव्हत्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धांदल उडाली. उमेदवारांना दाखले जमा करून, पक्षांशी विचारविनिमय करून, थकबाक्‍या भरून अर्ज दाखल करायला कमी अवधी मिळाला. परिणामी आज शेवटच्या दिवशी तब्बल 387 अर्ज दाखल केले. 

निवडणुक प्राधिकरणाच्या या बेजबाबदारपणामुळे प्रशासनाची आणि उमेदवारांचीही प्रचंड धांदल झाली. कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून आज गर्दीत कार्यभार पार पडत होता. दरम्यान, कारखान्याची निवडणूक सध्या तरी तिरंगी अवस्थेतून चालली आहे. भाजपने उशिरा मोट बांधली असली तरी त्यांना 21 जागांसाठी शेवटच्या दिवशी ऐन मोक्‍यावर 35 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात यश आले. तर शेतकरी कृती समितीनेही सध्या दंड थोपटले असून 55 अर्ज दाखल झाले आहेत. उरलेले सर्व अर्ज हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांचे आहेत. 

राष्ट्रवादीसाठी चालू निवडणुकीत पोषक वातावरण असल्याने दिग्गजांसह गावोगावच्या इच्छुकांचेही अर्ज आले असल्याने पक्षनेतृत्वाला कमालीची कसरत करावी लागणार आहे, हे निश्‍चित. यामध्ये पुरूषोत्तम जगताप, जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम सभापती प्रमोद काकडे, माजी सभापती दत्ता चव्हाण यांचा समावेश आहे.

शेतकरी कृती समितीकडून सतीश काकडे, अप्पासाहेब गायकवाड, प्रा. बाळासाहेब जगताप, कल्याण भगत, शहाजी जगताप, राहुल काकडे, अभिजित काकडे आदी मैदानात उतरले आहेत, तर भाजपकडून दिलीप खैरे, पी. के. जगताप, आदिनाथ सोरटे, बाळासाहेब भोसले, शंकर दडस आदींनी शड्डू ठोकला आहे. 

विद्यमानांना पुन्हा व्हायचंय डायरेक्‍टर 

सध्या सोमेश्वर कारखान्यावर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असून 21 निवडून आलेले, तर दोन स्वीकृत संचालक आहेत. यापैकी उपाध्यक्ष शैलेश रासकर यांच्यासह नामदेव शिंगटे यांचा अपवाद वगळता सर्व संचालकांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. नामदेव शिंगटे यांच्याऐवजी नंदकुमार शिंगटे या त्यांच्या चिरंजीवांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सर्व संचालक पुन्हा इच्छुक आहेत. यापैकी किती जणांना पुन्हा संधी मिळणार, याची कार्यक्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख