हाराकिरीच्या परिस्थितीत आशेचा किरण : ४६ वयोवृद्धांनी केली कोरोनावर यशस्वी मात  

एवढ्या मोठ्या रुग्णांवर उपचार कसे करायचे, असा प्रश्न होता.
46 senior citizens of Velhe taluka successfully defeated Corona
46 senior citizens of Velhe taluka successfully defeated Corona

वेल्हे (जि. पुणे) : रेमडेसिव्हिर इंजेक्शनअभावी कोरोना रुग्णाचा मृत्यू....ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णाने सोडले प्राण....स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी रांगा...यांसारख्या ह्‌दय पिळवून टाकणाऱ्या घटना राज्यात घडत असताना वेल्ह्यासारख्या दुर्गम तालुक्यातील सुमारे ४६ वयोवृद्धांना कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. या सर्वांच वय हे ६० ते ९० च्या दरम्यान आहे. यामागील गुपीत सांगताना वेल्ह्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर म्हणाले की, या सर्व ज्येष्ठांकडून उपचारास मिळालेला प्रतिसाद महत्त्वाचा होता. तसेच, या सर्व ज्येष्ठांनी महिनाभरापूर्वी घेतलेली लसही महत्वाची ठरली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात हाराकिरीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून लसीकरण आणि इतर उपाय योजना करूनही राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे या महामारीपुढे सर्वजण हतबल झाले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्याची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. कोणाला बेड मिळत नाहीत, तर कोणाला व्हेंटीलेटरचा गरज आहे. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे, तर संपूर्ण राज्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू यासारख्या मन हेलवाणाऱ्या घटना दररोज घडत आहेत.

या सर्व नकारात्मक वातावरणात काहीसा दिलासा देणारी बातमी पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील वृद्धाश्रमात घडली आहे. कुटुंबातील कोणाचाही आधार नसणाऱ्या ४६ ज्येष्ठांनी कोरोना या महामारीवर यशस्वीपणे मात केली आहे. या सर्वांचे वय हे ६० ते ९० या दरम्यानचे आहे. यातील काही जणांना एका बेडवरून दुसऱ्या बेडवर हलवण्यासारखीही परिस्थिती नव्हती. रुग्णांची इच्छाशक्ती, डॉक्टरांचे परिश्रम आणि लसीकरण यामुळे हे सर्व शक्य झाले आहे.  

जनसेवा फाउंडेशनच्या रानवडी येथील वद्धाश्रमात 8 एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर वृद्धाश्रमातील 168 जणांची तातडीने कोरानाची चाचणी करण्यात आली. त्यात 47 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. एकाच वेळी एवढे पेशंट आढळल्याने वृद्धाश्रमाचे व्यवस्थापन हादरून गेले होते. कारण हे सर्व पेशंट वयोवृध्द असून काहींना बेडवरून हलताही येत नव्हते, तर काहींना अनेक व्याधी जडलेल्या अशी या ज्येष्ठाची परिस्थिती होती. 

वेल्हे तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात व कोंढावळे येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये शंभरहून अधिक रुग्ण असल्याने बेड शिल्लक नव्हते. पुण्यातही बेड मिळणे अशक्य होते. अशा वेळी या रुग्णांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर, वेल्ह्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी करत याच ठिकाणी सर्व रुग्णांना उपचार देण्याचे ठरविले.

त्यानंतर वृद्धाश्रमातच कोविड केअर सेंटर उभे करण्यात आले आणि उपचारास सुरुवात झाली. या ज्येष्ठ कोरोना रुग्णांकडून उपचारास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. सुमारे तेरा दिवसानंतर म्हणजे 21 एप्रिल रोजी 46 रुग्ण बरे झाले, तर एका वृध्दाचा मृत्यू झाला.

वेल्हे महसूल, पंचायत समिती व आरोग्य विभाग व स्थानिक लोकप्रतिनीधींनी या रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ज्येष्ठांना वेळेत उपचार मिळून त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. 

लसीकरणाचा फायदा झाला : वैद्यकीय अधिकारी 

रानवडी येथील वृध्दाश्रमातील रुग्णांवर उपचार करणे मोठे आव्हान होते. परंतु रुग्णांकडून उपचारास मिळालेला प्रतिसाद महत्वाचा ठरला. तसेच या सर्वांनी महिन्यापूर्वी घेतलेल्या लसीचा परिणामही चांगला दिसून आला. तालुक्यासह सर्वत्र लसीकरण मोहीम राबविणे गरजेचे आहे, असे वेल्ह्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अंबादास देवकर यांनी सांगितले. 

वेल्हे तालुका लोकसंख्येने छोटा असला तरी याठिकाणी कोणतेही खासगी सक्षम हॉस्पिटल नाही, त्यामुळे सरकारी यंत्रणेवर त्याचा मोठा ताण येत आहे; परंतु प्रशासनाचे योग्य नियोजन व परिश्रमाच्या जोरावर असे सुखद अनुभव येत आहेत.

-शिवाजी शिंदे, तहसीलदार, वेल्हे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com