इंदापूरच्या तुरुंगातील 16 कैद्यांना कोरोनाची लागण  - 16 inmates of Indapur jail infected with corona | Politics Marathi News - Sarkarnama

इंदापूरच्या तुरुंगातील 16 कैद्यांना कोरोनाची लागण 

डॉ. संदेश शहा 
गुरुवार, 4 मार्च 2021

इंदापूर येथील तुरुंगातील 19 कैद्यांना गेल्या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती.

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर येथील तुरुंगातील 16 कैद्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यातील सहा जणांना ता. 2 मार्च रोजी, तर 10 कैद्यांना ता. 4 मार्च रोजी कोरोनाची बाधा झाला आहे. एकूण 16 कैद्यांवर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत, अशी माहिती प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली. 

दरम्यान, फ्ल्यूसारखी लक्षणे असलेल्या रुग्णांनी घाबरून न जाता आपली आरोग्य तपासणी तातडीने करून घ्यावी, जेणेकरून त्यांच्यावर तातडीने उपचार झाल्यास या आजाराचा फैलाव कमी होईल, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी सुहास शेळके यांनी केले आहे. 

दरम्यान, इंदापूर येथील तुरुंगातील 19 कैद्यांना गेल्या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्याची तक्रार मानवी हक्क आयोगाकडे करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यंदा मात्र कोरोना झालेल्या कैद्यांवर तातडीने उपचाराला सुरुवात करण्यात आली आहे. 

कोरोनाचे वाढते स्वरूप पाहता केंद्रीय आयुष मंत्रालयाने सूचित केल्याप्रमाणे नागरिकांनी प्रमाणित तसेच जीएमपी कंपनीचा पंचतुलसी व हळदी काढा तसेच होमिओपॅथीक आर्सेनिकम अल्बम 30 या औषधांचा वापर करावा, असे आवाहन तालुका आयुर्वेद व होमिओपॅथिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

हेही वाचा : जयंत पाटलांनंतर मुलगा प्रतीक यांनाही कोरोनाची लागण 

इस्लामपूर (जि. सांगली) : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव, सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष, युवा नेते प्रतीक पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. 

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबत आणि त्यांच्या अनुपस्थितीत प्रतीक पाटील हे संपूर्ण मतदारसंघात सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वीच मंत्री पाटील हेदेखील कोरोना पॉझिटिव्ह आले होते. ते सध्या मुंबई येथे क्वारंटाइन आहेत. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रतीक पाटील यांनी तत्काळ स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले होते. आता त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 

प्रतीक पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार घरी मी विलगीकरणात आहे. काळजी नसावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा.' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख