वाबळेवाडी शाळेतील आणखी १० शिक्षकांचा राजीनाम्याचा इशारा; ग्रामस्थ शिक्षकांच्या पाठीशी

शाळेची बदनामी करणारांचा आम्ही बंदोबस्त करू.
10 more teachers of Wablewadi school warned of resignation
10 more teachers of Wablewadi school warned of resignation

शिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यासह तिघांनी गुरुवारी (ता. २२ जुलै) शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर आज (ता. २३ जुलै) शाळेतील उर्वरित दहा शिक्षकांनी सामूहिक राजीनाम्याचे इशारापत्र शिरूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. (10 more teachers of Wablewadi school warned of resignation)

दरम्यान, शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आज सह्यांची मोहिम हाती घेऊन शाळेची बदनामी करणारांचा जाहीर निषेध करीत २०१२ पासूनचा सर्व आर्थिक हिशेब सोशल ऑडिट म्हणून सर्व प्रशासकीय यंत्रणांना स्वत:हून देण्याचा निर्णय घेतला. वाबळेवाडी ग्रामस्थांनी फक्त नावे सांगावीत; शाळेची बदनामी करणारांचा आम्ही बंदोबस्त करू, असा इशारा युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी दिला आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेबाबत उलट-सुलट बातम्या येत आहेत, त्यामुळे गुरुवारी (ता. २२ जुलै) मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे, शिक्षक एकनाथ खैरे आणि वारे यांच्या समर्थनार्थ केंदूरचे मुख्याध्यापक जयसिंग नऱ्हे यांनीही राजीनामा दिल्याचे तीव्र पडसाद आज वाबळेवाडीत उमटले. आज सकाळपासूनच ग्रामस्थ, पालक यांनी शाळेत येऊन शाळा बदनाम करणारांचा तीव्र भाषेत निषेध व्यक्त केला. ज्यांना बावळेवाडी शाळा, ग्रामस्थांचे योगदान आणि येथील शिक्षणपध्दती समजत नाही, असेच लोक समोर येऊन न बोलता नथीतून तीर मारतात, अशा प्रतिक्रिया महिला पालकांनी दिल्या. 

सन २०१२ पासून शाळेसाठी लोकवर्गणी सुरू झाली आणि शाळेची कामेहीही सुरू झाली. तेव्हापासूनचा संपूर्ण जमा-खर्च एकत्रित करुन तो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष-उपाध्यक्ष, शिक्षणाधिकारी, राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय आज ग्रामस्थ व पालकांनी घेतला. त्याचे कामही तातडीने सुरू केल्याचे माजी सरपंच केशवराव वाबळे, प्रकाश वाबळे, भगवान वाबळे, सतीश वाबळे, सर्जेराव वाबळे आदींनी सांगितले. 

दरम्यान, वाबळेवाडी शाळेची बदनामी तत्काळ थांबली नाही तर सामूहिक राजीनामा देण्याचे इशारापत्र उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, सुनील पलांडे, जयश्री पलांडे, पोपट दरंदले, गोरख काळे, दीपक खैरे, सचिन बेंडभर, संदीप गिते, प्रतिभा पुंडे व तुषार सिनलकर आदी शिक्षकांनी दिले. शाळेतील बैठकीला संदीप वाबळे, संतोष भुजबळ, ऋषीकेश करंजे, अशोक वाबळे, अशोक कोठावळे, सतीश कोठावळे व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

त्या शिक्षकांची मोफत शिकविण्याची ग्वाही

वाबळेवाडी शाळेतील जिल्हा परिषदेच्या १२ शिक्षकांशिवाय ग्रामस्थांच्या वतीने नेमलेल्या १६ शिक्षकांचा पगार ग्रामस्थ देतात. शाळेवर आरोप झाल्यानंतर ग्रामस्थांनी जमा झालेली सर्व रक्कम सर्व पालकांना परत दिली. या सर्व १६ शिक्षकांचे पगार देण्याची परिस्थिती ग्रामस्थांची नसल्याचे दिसताच या सर्व १६ शिक्षकांनी या पुढे मोफत शिकविण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली, अशी माहिती माजी सरपंच केशवअण्णा वाबळे, अकुंश वाबळे, युवराज वाबळे, तुषार वाबळे, नीलेश वाबळे, डॉ. गणेश वाबळे, मल्हारी वाबळे, युवराज मांढरे आदींनी दिली.

त्यांचा बंदोबस्त युवा सेना करेल 

वाबळेवाडी ग्रामस्थांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी केल्याने राज्यातील १२०० शाळा वाबळेवाडीसारख्या बनविण्यासाठी महाआघाडी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. अशा शाळेला बदनाम करणांची नावे वाबळेवाडीकरांनी जाहीर करावीत. त्यांचा बंदोबस्त युवा सेना करेल, अशी ग्वाही युवा सेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांनी पत्राद्वारे दिली आहे. याबाबतचे पत्र बांगर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिल्याचेही सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com