यवतला 35 वर्षांनंतर मिळणार दोरगे आडनावाचा सरपंच!  - Yavat will get Dorge Sarpanch after 35 years! | Politics Marathi News - Sarkarnama

यवतला 35 वर्षांनंतर मिळणार दोरगे आडनावाचा सरपंच! 

हितेंद्र गद्रे 
शनिवार, 30 जानेवारी 2021

कुल गटाच्या सुरेश शेळके यांच्या गटाकडे सत्ता असलेल्या काळात काही वेळी संधी आली होती. मात्र, तसे घडले नाही (की घडू दिले नाही).

यवत (जि. पुणे) : गावातील बहुसंख्य रहिवाशांच्या आडनावाने अनेक गावे ओळखली जातात. अशाच गावांपैकी दौंड तालुक्‍यातील यवत हे "दोरगें'चे गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. मात्र, मागील 35 वर्षांपासून विविध कारणांमुळे येथे दोरगे आडनावाची व्यक्ती सरपंच होऊ शकलेली नाही. या वर्षी मात्र तशी शक्‍यता निर्माण झाली आहे. सरपंचपदाचे प्रमुख दावेदार असलेले समीर व सदानंद या दोन्ही उमेदवारांचे आडनाव दोरगे आहे. 

ग्रामीण भागात अनेक गावे तेथील बहुसंख्याक रहिवाशांच्या आडनावाने ओळखली जातात. अशाच गावांपैकी यवत हे "दोरगें'चे गाव म्हणून दौंड तालुक्‍यात आणि जिल्ह्यातही परिचित आहे. बहुसंख्येने असलेल्या समाजातील-भावकीतील सरपंच असावा असे संबंधितांना वाटते. मात्र 1984-85 पासून या गावाच्या सरपंचपदी दोरगे आडनाव असलेल्या व्यक्तीची वर्णी लागू शकली नव्हती. 

तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य व सरपंच वसंत दोरगे पाटील यांचा काळ हा दोरगेंचा सुवर्णकाळ मानला गेला. त्यांच्यावर मात करत सुरेश शेळके यांनी गावची सत्ता हाती घेतली आणि जिल्हा परिषद सदस्यपदही भूषवले. कुल गटाच्या सुरेश शेळके यांच्या गटाकडे सत्ता असलेल्या काळात काही वेळी संधी आली होती. मात्र, तसे घडले नाही (की घडू दिले नाही). त्यामुळे स्वतः सुरेश शेळके, दशरथ खुटवड, सुनंदा यादव, राजेंद्र लडकत, जगन्नाथ रायकर या दोरगे व्यतिरिक्त आडनावांची सरपंचपदी वर्णी लागली. 

त्यानंतर 2009 मध्ये थोरात गटाच्या कुंडलीक खुटवड, पंडीत दोरगे, सदानंद दोरगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कुल समर्थक सुरेश शेळके गटाकडून सत्ता ताब्यात घेतली. सलग दोन पंचवार्षिकला सरपंचपद आरक्षित असल्याने श्‍यामराव शेंडगे व रजिया तांबोळी हे (दोरगेतर) सरपंच झाले. त्यामुळे दोरगेंचा सरपंच व्हावा; म्हणून आटापिटा केलेल्या थोरात गटाला आरक्षणामुळे सलग दुसऱ्यांदा अपयश आले. 

थोरात गटाने आता तिसऱ्यांदा सत्ता ताब्यात ठेवली आहे आणि सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे अनेक वर्षांची ही इच्छा पूर्ण करण्याची नामी संधी या गटाकडे आली आहे. त्यास निवडून आलेल्या सदस्यांचा विरोधही नाही, असा पॅनेल प्रमुखांचा दावा आहे. मात्र, खुल्या प्रवर्गासाठी सर्वच दावेदार असतात हे विसरूनही चालणार नाही. 

थोरात गट म्हणतोय 'आमचं ठरलंय' 

यवतमधील थोरात गटाच्या प्रमुख नेत्यांपैकी पंचायत समितीचे माजी सदस्य कुंडलीक खुटवड यांचे पुतणे मनोहर खुटवड सदस्यपदी निवडून आले आहेत. त्यांचेही नाव चर्चेत सरपंचपदासाठी ठेवण्याचा काही "हितचिंतकांचा' प्रयत्न आहे. मात्र, केवळ चमत्कार झाला तरच ते शक्‍य आहे. अन्यथा "आमचं ठरलंय' अशीच थोरात गटाची भूमिका आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख