उरुळी कांचनमध्ये एकाच आडनावाचे दोन डझन उमेदवार 

उमेदवारांची नावे व गटतट पाहून, मतदारच नव्हे; तर गाव पुढारीही गोंधळून गेले आहेत.
Two dozen candidates with the same last name in Uruli Kanchan
Two dozen candidates with the same last name in Uruli Kanchan

लोणी काळभोर (जि. पुणे) : पूर्व हवेलीतील आर्थिकृष्ट्या संपन्न असणाऱ्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या 17 जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली आहे. उर्वरीत 16 जागांसाठी एकूण 55 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. मात्र, उमेदवारांची नावे व गटतट पाहून, मतदारच नव्हे; तर गाव पुढारीही गोंधळून गेले आहेत. 

ग्रामपंचायत सदस्यांसाठी विविध घटकांचे आरक्षण असते. मात्र, उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र एकाच आडनावाचे दोन डझनहून अधिक उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहेत. आरक्षण कोणतेही असो, आम्हीच लढणार या भूमिकेतून अनेक जण निवडणूक लढवित आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र भूमिका, प्रभागनिहाय स्वतंत्र आघाडी... युती.....गुप्त आणा भाका...एकमेकांना निवडून येण्यासाठी मदत करण्याच्या आणाभाका घेऊनही त्या पाळल्या जात नसल्याचे दिसत आहे. "एकाला चलो रे'चा नारा देत समोरच्याला अडचणीत आणण्याचे प्रत्येक उमेदवाराचे व त्यांच्या मार्गदर्शकांचे तंत्र मतदाराला बुचकाळ्यात टाकत आहे. यामुळे मतदानानंतर 18 तारखेला कोणाचा व कसा निकाल लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

मागील पाच वर्षांच्या काळात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या मनमानी व दिशाहीन कारभाराने कायमच राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय तालेवार उमेदवारांनी फक्त ग्रामपंचायतीवर निवडून येण्यासाठी कालचा प्रतिस्पर्धी आजचा मित्र म्हणून वॉर्डा-वॉर्डात हातमिळवणी केल्याचे दिसून येत आहे. एका प्रभागात सहकारी असलेला उमेदवार, सलगच्या प्रभागात मात्र प्रतिस्पर्धी अशा अनोख्या घरोब्याने मतदारच नव्हे तर राजकीय अभ्यासकही चक्रावले आहेत.

कालपर्यंत वॉर्डातील प्रतिस्पर्धी असणारे या निवडणुकीत एकत्र तर कालपर्यंत एकत्र असणारे या निवडणुकीत प्रतिस्पर्धी बनले आहेत. जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे गटाचे आणि नेतृत्वाचे अस्तित्व कोठेही दिसत नाही. यामुळे जो जिता वही सिकंदर हे वास्तव आज तरी उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दिसत आहे. 

नेता कुठे? गट कुठे? 

उरुळी कांचन ग्रामपंचायत उमेदवारांवर एक नजर टाकली असता अनेक मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन यांचे पती अमित कांचन, पंचायत समिती सदस्या हेमलता बडेकर, माजी सरपंच अश्विनी कांचन यांचे पती राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, भाऊसाहेब कांचन, जितेंद्र बडेकर, सागर कांचन, यांच्यासह उरुळी कांचन मधील अनेक मातब्बर नेते नशीब अजमावत आहेत. 

या नेत्यांनी प्रभागनिहाय आपापल्या गटाच्या भूमिका वेगवेगळ्या ठेवल्याने, "परग्रहावरील तारे मोजता येतील; पण उरुळी कांचनच्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा अंदाज बांधणे महाकठीण आहे, अशी चर्चा सुरू आहे. 

संधिसाधूपणाचे राजकारण 

उरुळी कांचन ग्रामपंचायत रस्ते, बेकायदा बांधकाम, पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ, अतिक्रमण या सारख्या अनेक समस्यांच्या गर्तेत आहे. उरुळी कांचन सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला सशक्त नेतृत्वाचा पर्याय मिळेल म्हणून जनता या निवडणुकीकडे पाहत आहे. मात्र, निवडणुकीत शह-काटशहाचं राजकारण करणाऱ्या मंडळींचा संधिसाधूपणा ठळकपणे जाणवत आहे.

प्रत्येक निवडणुकीत येथील मतदार आपल्या समस्या सोडविणारा प्रतिनिधी निवडून देण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दरवेळी ती अपेक्षा फोल ठरते. यंदा तरी ती अपेक्षा फलद्रूप होते का? हे पाहण्यासाठी मात्र 18 जानेवारीची वाट पाहवी लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com