भोर : सरपंचपदाच्या आरक्षणानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदावरून तू तू-मैं मैं सुरु झाले आहे. बहुतेक इच्छुकांनी आरक्षण जाहीर झाल्यापासून संख्याबळ जुळवण्यासाठी ताकद लावलेली आहे.
आरक्षणानंतर ठिकठिकाणची समीकरणे बदलली आहेत. अनेक विजयी सदस्य सरपंच होण्यासाठी इच्छुक आहेत मात्र आरक्षणानंतर काहींचा अपेक्षा भंग झाला आहे तर काहींना लाभाचे पद मिळणार आहे. राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केल्यामुळे बहुतेक ग्रामपंचायतींमधील उमेदवार पॅनेलच्या नावाखाली एकत्रीत आले होते. त्यांनी प्रचारही एकत्रितपणे केला पण आरक्षण जाहीर झाल्यापासून ती एकी राहिलेली नाही.
आरक्षणामुळे ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे सरपंचपदासाठीच्या इच्छुकांनी सदस्यांशी गुप्त चर्चा सुरु केली आहे. विजयी सदस्यांची बडदास्त ठेवण्यास सुरुवात झाली आहे तर काहींनी विजयी सदस्यांना पर्यटनाचे पॅकेजही देवू केले आहे. काही उमेदवार तर गायबही झाले आहेत. ते फक्त सरपंचपदाच्या निवडणुकीच्या दिवशीच येतील, अशी परिस्थिती आहे.
ज्या ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची संख्या कमी आहे, तेथे सरपंच पद ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांकडून इतर मार्ग अवलंबले जात आहेत. तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या गावांमधील सरपंचपदाचे आरक्षण पडल्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. काही ठिकाणी संबंधित आरक्षणाचा उमेदवारच नसल्यामुळे सरपंचपद रिक्त राहण्याची शक्यता आहे.
Edited By - Amit Golwalkar

