...म्हणून आर. आर. आबांनी पाचर्णेंऐवजी मला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली  ः अशोक पवार - .... so R. R. Aaba gave me NCP candidature instead of Pacharne : Ashok Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

...म्हणून आर. आर. आबांनी पाचर्णेंऐवजी मला राष्ट्रवादीची उमेदवारी दिली  ः अशोक पवार

नितीन बारवकर
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

माझ्या परस्पर राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांची मुंबईत भेट घेऊन माझ्या उमेदवारीचा आग्रह धरला.

शिरूर : ‘‘शिरूर तालुक्यातील वकील बांधवांमुळेच मला २००९ च्या विधानसभा निवडणुकीतून राजकारणात ‘पुढचे पाऊल’ टाकता आले. मी वकील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष (स्व.) आर. आर. पाटील हे वकील त्यामुळेच शिरूरच्या वकील मंडळींच्या शिष्टमंडळाने माझ्या उमेदवारीचा धरलेला आग्रह त्यांना डावलता आला नाही. त्यांच्यामुळे तिकिट मिळून मी आमदार झालो,’’ अशा शब्दांत आमदार ॲड. अशोक पवार यांनी आपल्या आमदारकीच्या वाटचालीचा उलगडा केला. 

शिरूर तालुक्यातील वकीलांच्या मेळाव्यात आमदार ॲड. पवार बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस लिगल सेलच्या शिरूर तालुकाध्यक्षपदी ॲड. प्रदीप बारवकर यांची निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. दिलीप करंडे यांनी या नियुक्तीचे पत्र ॲड. बारवकर यांना दिले. आमदार ॲड. पवार यांच्या हस्ते या नियुक्तीबद्दल ॲड. बारवकर यांचा सन्मान करण्यात आला. 

विधानसभेच्या २००९ च्या निवडणुकीतील उमेदवारी मिळण्याचा प्रवास आमदार ॲड. पवार यांनी या वेळी उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, तत्कालीन विद्यमान आमदार (बाबुराव पाचर्णे) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्याने त्यांनाच उमेदवारी मिळेल असा, अनेकांचा होरा होता. तथापि, सर्वसामान्य जनतेची भावना माझ्यासोबत होती. शिवाय सुशिक्षित घटकांचे पूर्ण पाठबळ मला होते. शिरूर तालुक्यातील वकील मंडळींनी तर माझ्या परस्पर राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांची मुंबईत भेट घेऊन माझ्या उमेदवारीचा आग्रह धरला. आर. आर. आबादेखील वकील, मी पण वकील. त्यामुळे वकिलांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आणि मला उमेदवारी दिली. त्यानंतर निवडणुकीत मी विजय देखील झालो.    

कोर्टाच्या इमारतीसाठी ३३ कोटी मंजूर

शिरूर न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी राज्य सरकारने तब्बल ३३ कोटी रूपये मंजूर केले आहेत. न्यायालयीन कामकाज व दप्तर शिफ्ट झाले की कुठल्याही क्षणी नवीन न्यायालय इमारतीचा भूमिपजन समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला जाईल, असे आमदार अड. पवार यांनी सांगितले. शिरूर नगर परिषदेचे नवीन कार्यालय, शिरूर शहरातील अद्ययावत बस स्थानक, पोलिस ठाण्यासाठी नवीन इमारत, स्पोर्टस कॉम्प्लेक्स व शहरातून जाणारा रस्ता ही कामे देखील युद्धपातळीवर मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले. एसआरए ही झोपडवासियांच्या पुनर्वसनाची योजना निमशहरी भागात देखील राबवावी, यासाठी आपण आग्रही आहोत. सरकारदरबारी त्याबाबत पाठपुरावा चालू आहे. या पाठपुराव्याला यश आल्यास सर्वप्रथम शिरूर शहरातील झोपडवासियांचे पक्क्या घरांत पुनर्वसन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
                               
वकीलांचे दैनंदिन प्रश्न व प्रलंबित समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्याबरोबरच वकीलांचे एक मजबूत संघटन करण्याला या पदाच्या माध्यमातून प्राधान्य देणार असल्याचे ॲड प्रदीप बारवकर यांनी सांगितले. वकील व सामान्य माणसांचे संबंध दुरावत चालले असताना हे नाते अधिक दृढ करताना सामान्यांना न्याय स्वस्त व सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.     

राष्ट्रवादी लिगल सेलचे प्रदेश सरचिटणीस ॲड. शिरीष लोळगे, शिरूर बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, ज्येष्ठ संचालक ॲड. वसंतराव कोरेकर, रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. रंगनाथ थोरात, शिरूर खरेदी-विक्री संघाचे संचालक सुरेश पाचर्णे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवक आघाडीचे शहर अध्यक्ष रंजन झांबरे, युवती आघाडीच्या तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे, शहराध्यक्ष तज्ञिका कर्डिले, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस राहिल शेख, राष्ट्रवादी लिगल सेलचे शहराध्यक्ष ॲड. रवींद्र खांडरे, ॲड. संदीप उमाप आदी यावेळी उपस्थित होते.  

ॲड. संदीप पवार यांनी स्वागत केले. ॲड. दिलिप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.  संजय ढमढेरे यांनी आभार मानले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख