नवनिर्वाचित सरपंचास पहिल्याच दिवशी अटक

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या पॅनेलचा पराभव हा चर्चेचा विषय झाला होता.
Sarpanch of Wadgaon Rasai arrested for holding illegal procession
Sarpanch of Wadgaon Rasai arrested for holding illegal procession

शिरूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार यांचे गाव असलेल्या वडगाव रासाई येथे सरपंच निवडीनंतर विना परवाना मिरवणूक काढणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि साथरोग नियमावलीचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रदीप कंद, नवनिर्वाचित सरपंच सचिन शेलार यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नवनिर्वाचित सरपंच सचिन शेलार, भारतीय जनता पक्ष सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष काका खळदकर, शिवसेनेचे विभाग संघटक वीरेंद्र शेलार यांच्यासह भाऊ यादव, सुरेश शेलार, पोपट शेलार, मोहन चव्हाण यांना आज पोलिसांनी अटक केली होती. शिरूर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली. 

आमदार ऍड. अशोक पवार यांच्या वडगाव रासाई ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा पराभव झाला होता. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या पॅनेलचा पराभव हा चर्चेचा विषय झाला होता. त्यानंतर बुधवारी (ता. 24 फेब्रुवारी) वडगाव रासाईत सरपंच आणि उपसरपंचांची निवड होती.

या दोन्ही पदाच्या निवडणुकीनंतर गावात विजयी मिरवणूक निघाली होती. त्या गावात जाऊन सरपंचाच्या मिरवणुकीत बेकायदा जमाव जमवून सहभागी होणे, जल्लोष करणे या हे कंद यांना महागात पडले होते. जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी; तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियमांचा भंग केल्याप्रकरणी नूतन सरपंचांसह कंद यांच्यावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

पोलिस कॉन्स्टेबल योगेश गुंड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, वडगाव रासाईचे नवनिर्वाचित सरपंच सचिन शेलार, संपत ऊर्फ नाना संभाजी फराटे यांच्या मालकीच्या जेसीबीवरील चालक, सुरेश गुलाब शेलार यांच्या बेंजोच्या गाडीचा चालक, भाजप सहकार आघाडीचे तालुकाध्यक्ष काका खळदकर, शिवसेनेचे विभाग संघटक वीरेंद्र शेलार, मोहन चव्हाण, भाऊ यादव, पोपट पंढरीनाथ शेलार यांच्याविरूद्ध गुरुवारी (ता. 25 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वडगाव रासाई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची बुधवारी (ता. 24) निवडणूक झाली. निवडीनंतर नवनिर्वाचीत सरपंच सचिन शेलार हे ग्रामपंचायतीसमोरील मोकळ्या जागेत आले असता, प्रदीप कंद यांच्यासह आठ ते दहाजण हे जेसीबीच्या बकेटमध्ये बसले व तेथून त्यांनी गुलालाची उधळण केली. या वेळी पन्नास ते साठ जणांनी विनापरवानगी मिरवणूक काढून घोषणाबाजी करीत जल्लोष करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. 

सरपंच-उपसरपंच निवडणुकीनंतर कुठल्याही प्रकारे विनापरवाना मिरवणूक काढू नये, गर्दी जमवू नये, कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क लावावेत असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिलेले असताना आणि जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश असताना बेकायदा गर्दी जमविल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com