आमदार अशोक पवारांच्या वडगाव रासाईसह 28 गावांचे सरपंचपद खुले  - Sarpanch posts of 28 villages in Shirur taluka announced for general class | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार अशोक पवारांच्या वडगाव रासाईसह 28 गावांचे सरपंचपद खुले 

नितीन बारवकर 
शुक्रवार, 29 जानेवारी 2021

आरक्षणानंतर तालुक्‍यातील अनेक मोठ्या गावांतून सरपंचपदाच्या जुळवाजुळवीच्या राजकारणाला वेग आला आहे. 

शिरूर (जि. पुणे) : शासकीय निर्णयानुसार यापूर्वी काढण्यात आलेले अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम ठेवत उर्वरित 82 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) सोडत पद्धतीने काढण्यात आले. या आरक्षणानंतर तालुक्‍यातील अनेक मोठ्या गावांतून सरपंचपदाच्या जुळवाजुळवीच्या राजकारणाला वेग आला आहे. 

दरम्यान, आमदार अशोक पवार यांच्या वडगाव रासाई या गावासह तालुक्‍यातील 28 गावांचे सरपंचपद खुले असणार आहे. वडगाव रासाई गावात मात्र आमदार पवारांच्या पॅनेलचा पराभव झाला असून सत्ता विरोधकांच्या ताब्यात आहे. 

तालुक्‍यातील एकूण 93 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वी आठ डिसेंबरला काढण्यात आले होते. तथापि, ते आरक्षण रद्द करताना ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा शासकीय निर्णय झाल्याने शुक्रवारी (ता. 29 जानेवारी) नव्याने आरक्षण काढण्यात आले. 

शिरूर येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील सभागृहात, प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सोडत पद्धतीने हे आरक्षण काढण्यात आले. अवनीश अभिजीत कुलकर्णी या पाच वर्षीय विद्यार्थ्याने सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. 

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती; तसेच या प्रवर्गातील महिलांसाठीचे यापूर्वी (8 डिसेंबरला) काढलेले आरक्षण शासकीय निर्णयानुसार कायम ठेवण्यात आल्याचे तहसीलदार शेख यांनी सुरूवातीलाच जाहीर केले. उर्वरित 82 ग्रामपंचायतींपैकी 28 गावचे सरपंचपद खुले झाले; तर 29 गावातील सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले. नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी 12; तर याच प्रवर्गातील महिलांसाठी 13 गावचे सरपंचपद आरक्षित करण्यात आले. अनुसूचित जातीच्या आठ सरपंचपदापैकी महिलांसाठी चार राखीव करण्यात आले. तर अनुसूचित जमातीच्या तीन जागांपैकी दोन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. 

शिरूर तालुक्‍यातील 93 गावांचे सरपंचपदाचे आरक्षण गावनिहाय 
अनुसूचित जाती महिला : दहिवडी, गणेगाव खालसा, सरदवाडी व रांजणगाव गणपती. 
अनुसूचित जाती : पिंपरी दुमाला, पिंपळे जगताप, शिक्रापूर व टाकळी भीमा. 
अनुसूचित जमाती महिला : अण्णापूर व शिरूर ग्रामीण. 
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला : करंदी, करडे, शिरसगाव काटा, सविंदणे, बाभुळसर खुर्द, मांडवगण फराटा, चव्हाणवाडी, कर्डेलवाडी, चिंचणी, वाजेवाडी, मलठण, वडनेर खुर्द व तळेगाव ढमढेरे. 
नागरिकांचा मागास प्रवर्ग : जातेगाव बुद्रूक, मोटेवाडी, न्हावरे, चिंचोली मोराची, शिंदोडी, निर्वी, उरळगाव, निमगाव दुडे, वरूडे, जांबुत, कोंढापुरी व कासारी. 

सर्वसाधारण : खैरेनगर, पाबळ, आलेगाव पागा, पिंपळसुटी, बुरूंजवाडी, रावडेवाडी, तर्डोबाची वाडी, भांबर्डे, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रूक, मुखई, पिंपरखेड, कोरेगाव भीमा, आपटी, गुनाट, निमोणे, गोलेगाव, दरेकरवाडी, डिंग्रजवाडी, नागरगाव, वडगाव रासाई, केंदूर, धामारी, सादलगाव, निमगाव भोगी, निमगाव म्हाळुंगी, वढू बुद्रुक व वाडा पुनर्वसन. 

सर्वसाधारण महिला : आमदाबाद, टाकळी हाजी, कोळगाव डोळस, जातेगाव खुर्द, कारेगाव, खैरेवाडी, मिडगुलवाडी, पिंपळे खालसा, हिवरे, काठापूर खुर्द, सोनेसांगवी, करंजावणे, रांजणगाव सांडस, ढोकसांगवी, कळवंतवाडी, धानोरे, तांदळी, सणसवाडी, फाकटे, आंधळगाव, कुरुळी, कवठे येमाई, पारोडी, खंडाळे, वाघाळे, आंबळे, कान्हूर मेसाई, चांडोह, इनामगाव. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख