परिचारक आणि आमच्यात काय ठरलंय, हे आवताडेंना निकालानंतर कळेल

उमेदवार (समाधान आवताडे) यांच्या घरातील काही मंडळींनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
samadhan Avtade will know after the result what happened between prashant paricharK and me
samadhan Avtade will know after the result what happened between prashant paricharK and me

पंढरपूर  ः आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागणं कोणलाही अपेक्षित नव्हतं. आमदार प्रशांत परिचारक यांचीही तशीच भूमिका होती. पण, काहींना मागचं पुढचं सर्व डाव व्यवस्थित करून घ्यायचे होते. एमएच ४५ च्या (अकलूज, मोहिते पाटील) गाड्या यायला सुरुवात झाली आणि समाधान आवताडेंची इच्छा नसतानाही त्यांना बळचं तयार करण्यात आले. दोस्त असल्यामळे आवताडेंना सांगत होतो की नको नादाला लागू, ह्यांचे राजकारणातील डाव लयं बेकार असतात. ते म्हणाले की मला प्रशांतमालक पाठिंबा देतो म्हणाले आहेत. प्रशांत परिचारक आणि आमचं काय ठरलं आहे, ते तुला १५ तारखेनंतर कळंल, अशा शब्दांत आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर मित्र आमदार संजय शिंदे यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीतील डावपेचाबाबत गौप्यस्फोट केला. 

राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची वाखारी (ता. पंढरपूर) येथे सभा झाली. त्या सभेत आमदार संजय शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राज्यातील सर्व निवडणुका आपण जिंकल्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघ जहागीर आहे, असा समज काहींचा होता. पण पुण्यासह राज्यातील पाच जागा जिंकत महाविकास आघाडीची ताकद यानिमित्ताने पहायला मिळाली. पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ५५ हजारांची आघाडी मिळाली होती. जे पुणे पदवीधर मतदारसंघाला स्वतःची जहागिरी समजत होते, त्यांनाही एवढी आघाडी कधी मिळाली नव्हती. पदवीधरप्रमाणेच याही निवडणुकीत आपल्याला निकाल पहायला मिळले, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. 

गेली महिनाभर आम्ही मतदारसंघात फिरत आहोत. ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मागच्या निवडणुकीत कल्याणराव काळे भाजपमध्ये गेले होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच, उमेदवार (समाधान आवताडे) यांच्या घरातील काही मंडळींनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आम्ही म्हटलं की एकाच घरात हे बरं दिसायचं नाही. आम्ही त्यांना सांगितलं, तुमचं घरातील भांडण आहे. ते तुमचं तुम्ही मिटवा. कल्याणराव काळे यांच्या प्रवेशानंतर आपल्याला सोडून गेलेली अनेक मंडळी आपल्याकडे आली. पण, ही मंडळी आमच्यामुळे राष्ट्रवादीत आली, असे आम्ही म्हणणार नाही. राष्ट्रवादीतील जुन्या मंडळींची पद्धत अशी आहे की, कोणाच्याही घरी पोरं होऊ द्या. पेढे मात्र आम्हीच वाटणार. भाजपचा उमेदवार निवडून आला की आम्ही भाजपमध्ये होतो म्हणून निवडून आला, असा टोला मोहिते पाटील यांना नाव न घेता लगावला.  ही नेतेमंडळी महाविकास आघाडीच्या कामावर विश्वास ठेवून आली आहेत, असे ते म्हणाले.

भारतनाना भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागणं कोणलाही अपेक्षित नव्हतं. आपल्याप्रमाणेच अनेक नेतेमंडळींची इच्छा होती की ही निवडणूक बिनविरोधी व्हावी. पण काहींची इच्छा होती की मागचे पुढचे सर्व डाव व्यवस्थित करून घ्यायचे. आमदार प्रशांत परिचारक यांचीही ही निवडणूक लागू नये, अशीच भूमिका होती. मात्र, एमएच ४५ च्या (अकलूज, मोहिते पाटील ) गाड्या यायला सुरुवात झाली. आवताडे यांची इच्छा नसतानाही त्यांनी बळंच तयार करण्यात आले, असा आरोपही शिंदे यांनी केला.

आवताडे हेसुद्धा आमचे दोस्तच. त्यांनाही सांगत होतो की नको नादाला लागू, ह्यांचे राजकारणातील डाव लयं बेकार असतात. त्यावर ते म्हणाले की मला प्रशांतमालक पाठिंबा देतो म्हणाले आहेत. प्रशांत परिचारक आणि आमचं काय ठरलं आहे, ते तुला १५ तारखेनंतर कळंल. प्रशांतमालकांचीही त्यांनी पंचाईत करून ठेवली आहे. कारण, तिथं मालक झालीत चार. आवताडे यांना वाटलं की प्रशांतमालकही येतात म्हटल्यावर आपण सहज निवडून येतोय. पण, त्यांना आता कळायला लागलं आहे की खऱ्या भानगडी काय आहेत. त्यांनाही समजावून सांगत होतो. पण ते काही ऐकना. जिल्ह्यातील तरुण नेता (रणजितसिंह मोहिते पाटील) आतवाडेंना निवडणूक लढवा, सांगत होते. ज्या मतदारसंघात त्या तरुण नेत्याच्या वडिलांना येथील मतदारांनी दिवसा चांदण्या दाखवल्या. त्या मतदारसंघात ज्यांनी जनमताची कुठलीही निवडणूक लढवली नाही, अशी लोकं प्रचारप्रमुख म्हणून आली आहेत आणि त्यांच्या जिवावर समाधान आवताडे निवडणूक लढवत आहे, अशा शब्दांत आवताडे यांच्या निवडणूक लढविण्याची शिंदे यांनी खिल्ली उडवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com