जुन्नर (जि. पुणे) : काही महिन्यांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांच्यात जिल्हा परिषदेमध्ये वाद झाला होता. जिल्हा परिषदेच्या वर्तुळात त्याबाबतची चर्चा चांगलीच रंगली होती. त्या प्रकरणावर दोघेही मौन बाळगून होते. मात्र, जुन्नरच्या दौऱ्यावर आलेल्या आयुष प्रसाद यांनी त्या प्रकरणी असलेली उत्सुकता पाहून त्या वादावर प्रथमच भाष्य केले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद व जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या बुचके यांच्यात काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वाद झाला होता. या वादाच्या बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने जिल्ह्यात त्याची मोठी चर्चाही रंगली होती. या दोघांमध्ये नेमके काय झाले? याचा नेमका खुलासा मात्र या दोघांपैकी एकाकडूनही होत नव्हता. दोघांमध्ये रंगलेले "तू...तू , मैं...मैं' चे नाट्य गुलदस्त्यात राहिलं होते.
या नाट्यविषयी तालुक्यातील पक्षीय कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांना मोठी उत्सुकता होती. जुन्नर येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले प्रसाद यांनी ती उत्सुकता नेमकी हेरली आणि भाषणातून याबाबत जोरदार बॅटींग करत सभागृहात एकच हशा पिकवला.
आशा बुचके यांच्याबरोबर झालेल्या वादावर भाष्य करताना प्रसाद यांनी सांगितले. तुमचे सीईओ व्यवस्थित आहेत आणि सुरक्षितदेखील आहेत, असे सांगत सीईओ आणि जिल्हा परिषद सदस्यामध्ये वाद विवाद आणि हमरीतुमरी झाल्याबद्दल सोशल मीडियावर बातमी फिरत होती. मला देखील अनेकांनी याविषयी विचारले होते. पण असे वाद क्षणिक असतात. असे स्पष्ट करताना आम्ही सोबत राहतो; म्हणजे वाद, मतभेद तर होणारच. आशाताई माझ्या आईच्या वयाच्या आहेत. आजदेखील त्यांनी मला मेसेज केलाय...जेवण झालं का म्हणून? जुन्नर तालुक्याचे हेच वैशिष्ट्य आहे की, वादाच्या विषयात तालुका कधी पडत नाही.
"जुन्नर तालुक्याचा विकास व समाजकारण यासाठी राजकीय विचार बाजूला ठेऊन तालुक्यातील सर्वजण एकत्र येतात. मला अजूनही कळले नाही की, देवराम लांडे कोणत्या पक्षात आहेत?'' असे म्हणताच व्यासपीठावरील लांडे यांच्यासह सभागृहातील उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

