आमदार मोहिते-पाटील म्हणतात, मुख्यमंत्री महोदय सोलापूरसाठी एवढे कराच...

कोरोनाचे महाभयंकर संकट आता शहराबरोबर खेड्यांमध्येही घोंगावू लागले आहे. आज पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
RanjitSinh Mohite-Patil's letter to the Chief Minister regarding the Corona solution scheme
RanjitSinh Mohite-Patil's letter to the Chief Minister regarding the Corona solution scheme

पुणे ः कोरोनाचे महाभयंकर संकट आता शहराबरोबर खेड्यांमध्येही घोंगावू लागले आहे. आज पुण्या-मुंबई सारख्या मोठ्या शहरानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात कोरोना निर्मूलन करण्यासाठी आठ मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत. 

गेल्या दीड महिन्यापूर्वी सोलापूर शहरात कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता. आजअखेर जिल्ह्यात सात हजार पेक्षा जास्त संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यात 748 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, पाच हजार 680 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सुमारे 355 कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात व ग्रामीण भागात 72 रुग्णांचे मृत्यू झालेले असून 321 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत विदारक असून जिल्ह्यातील मृत्यूदर हा जवळपास 10 टक्‍यांपर्यंत पोचलेला आहे, असे मोहिते पाटील यांचे म्हणणे आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात ते पुढे म्हणाले की, यावर उपाय म्हणून मी गेल्या दीड महिन्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार, पत्रकार तसेच समाजातील वेगवेगळ्या घटकांशी वेळोवेळी संवाद साधून निरीक्षण केले असता त्यातून काही उपाय योजना आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सुचविलेल्या उपाय योजना 

►सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वरचे वर वाढत आहे. शहरात व ग्रामीण भागात पण स्वॅब टेस्टींग सेंटर व कोव्हीड टेस्टींग सेंटर वाढविणे गरजेचे आहे. त्यातून कोरोना बाबतचा अहवाल तातडीने मिळून रुग्णांवर त्वरीत उपचार सुरु होण्यास मदत होईल. 

►ताप, खोकला, सर्दी या सारख्या आजाराचे निदान करण्यासाठी फीवर क्‍लिनीकची संख्या वाढविणे गरजेचे आहे, त्यामुळे तातडीने रुग्णाचे निदान होण्यास मदत होईल. 

►कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी दवाखान्यातील डॉक्‍टरांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना संरक्षण व प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. 

►खाजगी दवाखान्यांना स्वॅब टेस्टिंगची परवानगी दिली तर तातडीने रुग्णाचे निदान होऊन रुग्ण संख्येवर नियंत्रण येण्यास मदत होईल. 

►राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागात क्वारंटाइनसाठी जेथे सुसज्ज इमारती नाहीत, अशा भागात जर वैद्यकीय व तांत्रिक बाबी तपासून तंबू हा योग्य असेल, तर तेथील क्वारंटाइनसाठी इमारतीच्या बाबतीतील अडचणी दूर होण्यास मदत होईल. सोलापूर शहर हे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध आहे. तंबूसाठी लागणारे कापड हे शहरातील कापड गिरण्यातून उपलब्ध होऊन त्यामुळे कापड उद्योगास चालना मिळेल. त्यातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. शहराचे कोलमडलेले अर्थकारण सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाला व जगाला तंबूचे कापड पुरवू शकलो तर या शहराला मोठा आर्थिक आधार होईल. 

►सध्या उन्हाळा संपून शेतात खरीप हंगामाची कामे सुरु झाली आहेत. कोरोनामुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून सध्या युरिया, खते व बि-बियाणे यांचा तुटवडा जाणवतो. त्यासाठी युरिया, खते व बि-बियाणे यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होणे गरजेचे आहे. 

►कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शेतकऱ्यांची व दुधाची अडचण लक्षात घेता सरकारने राज्यातील सर्व सहकारी दूध संघांचे अतिरिक्त दूध महानंदा दूध डेअरीमार्फत खरेदी केले जात आहे. त्याची मुदत 31 मे रोजी संपत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महानंदा दूध डेअरीस सहकारी दूध संघांचे दूध खरेदी करण्यास आणखी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी. त्यामुळे राज्यातील सहकारी दुध संघ व शेतकरी यांना त्याचा फायदा होण्यास मदत होईल. 

►सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायतींना कोरोना विषाणूचा प्रतिबंधक उपाय करण्यासाठी सोडियम हायड्रोक्‍लोराईड फवारणी करणे, सॅनिटायझर व मास्क वाटप करणे, स्कूल क्वारंटाइन रुग्णांसाठी सोयी सुविधा व भोजन व्यवस्था करणे तसेच इतर अनुषंगिक बाबीच्या सोयी सुविधा पुरविणे यासाठी ग्रामपंचायतीना निधीची अडचण असल्याने ग्रामपंचायतींना सरकारकडून अनुदान द्यावे. 

मोहिते पाटील यांनी लिहिलेल्या या पत्राची प्रत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे. त्याबाबत फडणवीस कसा पाठपुरावा करतात आणि त्यावर मुख्यमंत्री ठाकरे काय प्रतिसाद देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे असेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com