पीएचडीसह बारा पदव्या मिळविणारे डॉ. कोकाटे सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार  - In the Pune graduate constituency, Dr. shrimant Kokate became the most highly educated candidate | Politics Marathi News - Sarkarnama

पीएचडीसह बारा पदव्या मिळविणारे डॉ. कोकाटे सर्वाधिक उच्चशिक्षित उमेदवार 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

अर्ज माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीच्या रिंगणात 62 उमेदवार उरले आहेत.

पुणे : पदवी, पदविका आणि पीएच.डी. मिळून बारा पदव्या मिळविणारे डॉ. श्रीमंत कोकाटे हे पुणे पदवीधर मतदारसंघातील एकमेव उमदेवार आहेत. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर निवडणुकीच्या रिंगणात 62 उमेदवार उरले आहेत.

या सर्व उमदेवारांमध्ये सर्वाधिक उच्चशिक्षित डॉ. कोकाटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर पीएच.डी.चे संशोधन करून डॉक्‍टरेट मिळविली आहे. 

डॉ. कोकाटे यांनी पाच विषयांत पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पाच विषयांत डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे. इतिहास विषयात सेट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यामुळे सेट परीक्षेतील यशासह त्यांनी तब्बल 12 पदव्या संपादन केल्या आहेत.

पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. कोकाटे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. पदवीधर तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे. पुणे मतदारसंघ जुन्नरपासून जत, अक्कलकोट, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि शिरूरपासून महाबळेश्वरपर्यंत त्यांनी पाच वर्षांत पिंजून काढलेला आहे. अनेक शाळा, महाविद्यालये, वकील बार संस्था, संघटना, व्यक्ती यांना प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका मांडलेली आहे. 

डॉ. कोकाटे यांनी आतापर्यंत देश-विदेशांत सुमारे पाच हजार व्याख्याने दिलेली आहेत. सांस्कृतिक लढ्यामध्ये ते सातत्याने अग्रेसर असतात. संविधानिक लोकशाहीच्या रक्षणासाठी ते सतत लढत असतात. त्यांचा चाहता वर्ग सर्व बहुजन समाजामध्ये आहे.

तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी महापुरुषांचा इतिहास सांगून दिशा देण्याचे काम डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी सातत्याने करीत आहेत. आपण केलेल्या सातत्यापूर्ण कामाचा विचार पदवीधर मतदार नक्की करतील, असा विश्‍वास डॉ. कोकाटे यांनी व्यक्त केला. 

डॉ. कोकाटे यांचे पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण पदवीधरांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करू, असा विश्‍वास डॉ. कोकाटे यांनी व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख