बाबुराव पाचर्णेंच्या त्या इच्छेमुळेच कंदांची पावले राष्ट्रवादीकडे!  - Pradip Kand's move towards NCP is due to Baburao Pacharne's role in contesting Assembly elections! | Politics Marathi News - Sarkarnama

बाबुराव पाचर्णेंच्या त्या इच्छेमुळेच कंदांची पावले राष्ट्रवादीकडे! 

भरत पचंगे 
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

मी त्या संबंधित माजी आमदारांशी बोलून प्रतिक्रिया देतो.

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या भारतीय जनता पक्षात असणारे प्रदीप कंद हे स्वगृही म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परतण्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्याबाबत कंद काहीच बोलायला तयार नाहीत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच उमेदवार आपणच असणार, या कंदांच्या सुप्त इच्छेला माजी आमदार बाबुराव पाचर्णेंकडून "आपण सप्तपदी करणार... (सातव्यांदा निवडणूक लढवणार)' ने प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळेच भाजपत जाऊनही आपली इच्छा पूर्ण होणार नसल्याचे पाहून कंदांची राजकीय पावले राष्ट्रवादीकडे पुन्हा वळू लागली आहेत. या चर्चेला आता भाजपचे पदाधिकारीही दुजोरा देत आहेत. 

"प्रदीप कंद पुन्हा घड्याळ हातात बांधण्याच्या तयारीत' या मथळ्याखाली "सरकारनामा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कंद यांनी "सरकारनामा'ला सांगितले की, मी त्या संबंधित माजी आमदारांशी बोलून प्रतिक्रिया देतो. हे सांगताना त्यांनी राष्ट्रवादीशी सलगी किंवा राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातमीबाबत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया थेटपणे दिली नाही. 

दरम्यान, कंदांची प्रतिक्रिया प्रतीक्षेत असतानाच माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे समर्थक तथा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी मात्र आज पाचर्णे आता सप्तपदी करणार आहेत. असे म्हणून माजी आमदार पाचर्णे हे आणखी चार वर्षे दूर असलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचेही सांगितले. 

माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांनी 1995 पासून सलग सहावेळा विधानसभा लढवली आहे. त्यात तीन वेळा माजी आमदार पोपटराव गावडे, तर तीन वेळा विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात ते लढले होते. यातील 2004-09 व 2014-19 या दोनवेळा ते विजयी झाले होते.

मात्र, सहाव्या लढतीत त्यांना अशोक पवार यांनी पराभूत केल्याने पाचर्णे आता निवृत्त होतील, असा अनेकांचा होरा होता. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांशी स्नेह, भाजपतील जुन्या-नव्या नेते-पदाधिकाऱ्यांशी असलेला उत्तम संवाद आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराशी थेटपणे लढत देणारा अन्य एकही तगडा उमेदवार गेल्या सहा पंचवार्षिकमध्ये पुढे येऊ शकला नसल्याने पाचर्णेंनी आता पुन्हा लंगोट बांधण्याची तयारी केल्याची माहितीही शेळके यांनी दिली. 

अर्थात, भाजपकडून माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, विद्यमान तालुकाध्यक्ष दादापाटील फराटे, विधानसभा निवडणुकीवेळी भाजपत आलेले क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी ही मंडळीही विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाकडे इच्छुक म्हणून हमखास राहतील, अशी स्थिती शिरूर-हवेली भाजपची आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख