वेल्हे (जि. पुणे) : वेल्हे तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांचे सुपुत्र, पंचायत समिती सदस्य अनंता दारवटकर यांनी आज (ता. 22 जानेवारी) आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत उपसभापतिपद मिळविले. पण, कॉंग्रेसच्या या खेळीमुळे तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र नाराज झाले आहेत.
अवघ्या आठ महिन्यांसाठी मिळणाऱ्या उपसभापतिपदासाठी अनंता दारवटकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करू नये. पंचायत समितीचे सभापतिपद देत असतील तर अनंता यांनी कॉंग्रेस पक्षात गेले असते तर चालले असते, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. विधानसभेला मदत करूनही कॉंग्रेसने पद देताना अट टाकल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
थोपटेंनी राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाला कॉंग्रेसमध्ये नेऊन उपसभापती केले #Sarkarnama #MarathiNews #SarkarnamaNews #PoliticalNews #AnantaDarwatkar #Elected #DeputySabhapati #Velhe #PanchayatSamiti #Pune @NCPspeaks https://t.co/3uKAMnndUs
— Sarkarnama (@SarkarnamaNews) January 22, 2021
वेल्हे तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस हे दोनच मोठे पक्ष आहेत. या पक्षांचीच सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेवर आलटून पालटून येते. तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद असून रेवणनाथ दारवटकर यांना मानणारा मोठा गट आहे. नुकत्याच निवडणुका झालेल्या 31 ग्रामपंचायतींमधील काही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांची एकहाती सत्ता आहे, तर काही ठिकाणी संयुक्तरित्या ग्रामपंचायती ताब्यात आल्या असून आघाडीची सत्ता ग्रामपंचायतींवर आहे.
वेल्हे पंचायत समितीवर मात्र कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून चार सदस्यांपैकी एकच सदस्य अनंता दारवटकर अपक्ष म्हणून निवडून आलेले होते. पंचायत समिती निवडणुकीवेळी अनंता यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे दारवटकरांनी स्वःताची ताकद पणाला लावत मुलाला अपक्ष म्हणून निवडून आणले होते. असे असले तरी या निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये व पक्षाच्या व्यासपीठावर दारवटकरांना मोठा मान आहे. परंतु त्यांचे चिरंजीव अनंता यांनी मात्र उपसभापतीपदासाठी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अनंता दारवटकर यांनी जरी कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिला असला तरी त्यांच्यासोबत तालुका पातळीवरील कोणत्याही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याने आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला नाही. या निवडीसाठी ते उपस्थितही राहिले नव्हते. अनेक कार्यकर्त्यांनी
नाव न छापण्याच्या अटीवर नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर म्हणाले, "अपक्ष म्हणून निवडून आलेला माझा मुलगा अनंता दारवटकर यांचा पक्ष बदलण्याचा स्वतंत्र निर्णय आहे.'' याबाबत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
राष्ट्रवादीचे वेल्हे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे म्हणाले, "आमच्या सहकाऱ्याला तालुक्याचे उपसभापतिपद मिळाले, याबाबत आम्हाला आनंद आहे.'' कॉंग्रेस प्रवेशाबद्दल त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

