आढळरावांनी सांसद आदर्श ग्रामसाठी निवडलेल्या करंदीत राष्ट्रवादीचा सरपंच - NCP power in Karandi Gram Panchayat elected by Shivajirao Adhalrao for MP Adarsh ​​Gram Yojana | Politics Marathi News - Sarkarnama

आढळरावांनी सांसद आदर्श ग्रामसाठी निवडलेल्या करंदीत राष्ट्रवादीचा सरपंच

भरत पचंगे 
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावात शिवसेना मोठ्या प्रमाणात पिछाडीवर राहिली होती.

शिक्रापूर (जि. पुणे) : शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांसद आदर्शग्राम योजनेसाठी निवडलेल्या करंदी (ता. शिरूर) ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घरचा रस्ता दाखवत राष्ट्रवादी कॉंग्रेसला पसंती दिली. निवडणूक पक्षीय चिन्हांवर झाली नसली तरी निकालानंतर एकुण 13 सदस्यांच्या ग्रामपंचायतीत सध्या राष्ट्रवादी-शिवसेना यांचे 8 : 5 असे बलाबल झाले आहे. 

शिरूर बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांच्या या गावात इतर मागासवर्गीय महिलेच्या जागेवर सुभद्रा कांतिलाल ढोकले या एकमेव उमेदवार निवडून आल्या आहेत. सरपंचपदाचे आरक्षणही ओबीसी महिला असे निघाले असल्याने ढोकले यांच्या सरपंच निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून सांसद आदर्शग्राम योजना देशात राबविली होती. त्यात प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेण्यास सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करंदीवर शिवसेनेचा झेंडा असल्याने याच गावाला पसंती देत विविध योजना राबवून तब्बल 10 कोटींची विकासकामे केली. मात्र, मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत गावात शिवसेना मोठ्या प्रमाणात पिछाडीवर राहिली होती. तीच पिछाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही करंदीत पहायला मिळाली. मागील वेळी 12 :1 असे बलाबल असलेल्या शिवसेनेला या वेळी 8 : 5 अशी पिछाडी पहावी लागली. 

दरम्यान, शिवसेनेचे माजी उपसरपंच चेतन दरेकर यांच्या भोवती मागील वेळी फिरत राहिलेल्या करंदी ग्रामपंचायतीत त्यांचे वडील शिवाजी दरेकर हे बिनविरोध सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत पोचले. मात्र, त्यांच्या मातोश्री सुजाता दरेकर यांना पराभूत करत शोभा दरेकर यांनी बाजी मारली. 

करंदी ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या सुभद्रा कांतिलाल ढोकले यांच्या लढतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष होते. कारण, त्यांचे चिरंजीव अमर ढोकले हे ठाणे येथील भूमी अभिलेख खात्याचे उपअधीक्षक असल्याने व त्यांचा मित्रपरिवार तालुका व जिल्हाभर असल्याने ही जागा ढोकले कुटुंबीयांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेची होती. यात सुभद्रा ढोकले इतर मागासवर्ग महिला जागेवरून विजयी झाल्या. सरपंचपदाचे आरक्षणही इतर मागासवर्ग महिलेचे निघाल्याने त्याच सरपंच होणार आहेत, याची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे गावकारभाऱ्यांकडून सांगण्यात येते. 

दरम्यान, शिरूर बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर व माजी संचालिका सुप्रिया सुहासराव ढोकले यांचे गाव असलेल्या करंदीत यावेळी जांभळकरांसह पुणे महापालिकेतील अतिक्रम अधिकारी सुहासराव ढोकले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गोरक्ष ढोकले, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी ढोकले, बाबा सुदाम ढोकले, क्रांती युवा संघटनेचे अध्यक्ष विकास दरेकर, सैनिक ढोकले, शिरुर बाजार समितीचे निवृत्त सचिव पोपटराव निवृत्ती ढोकले, कॉंग्रेसचे तालुका सरचिटणीस माऊली दरेकर आदींनी विशेष लक्ष घालून विजयश्री खेचून आणल्याने या वेळी सरपंच राष्ट्रवादीचाच होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख