संग्राम थोपटे शब्द पाळणार; पण दारवटकरांना उपसभापतिपदासाठी घातली ही अट  - MLA Sangram thopte will keep his word; But this condition was imposed on Darwatkar for the post of Deputy Sabhapati | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

संग्राम थोपटे शब्द पाळणार; पण दारवटकरांना उपसभापतिपदासाठी घातली ही अट 

मनोज कुंभार 
गुरुवार, 21 जानेवारी 2021

त्यानंतर आमदार थोपटे यांनी तातडीने वेल्हे कॉंग्रेसची बैठक बोलावली.

वेल्हे (जि. पुणे) : "विधानसभा निवडणुकीवेळी आमदार संग्राम थोपटे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे वेल्हे पंचायत समितीच्या उपसभापतिपदी अनंत दारवटकर यांना संधी दिला जाईल. पण, त्यासाठी अनंत दारवटकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करावा, अशी अट ठेवण्यात येणार आहे,'' अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. 

विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द आमदार संग्राम थोपटे पाळणार का? असे वृत्त आज "सरकारनामा'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आमदार थोपटे यांनी तातडीने वेल्हे कॉंग्रेसची बैठक बोलावली. सुमारे तासभराच्या चर्चेनंतर कॉंग्रेस पक्षाकडून वरील अट दारवटकर यांच्यासमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते तथा पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक रेवनाथ दारवटकर यांच्याशी आमदार संग्राम थोपटे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दारवटकर हे उद्या याबाबतचा निर्णय घेणार आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे आता वेल्हे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

विधानसभा निवडणुकीतील मदतीबद्दल कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी वेल्ह्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर यांना त्यांचे चिंरजीव वेल्हे पंचायत समितीचे सदस्य अनंता यांना सभापतिपद देण्याचा शब्द दिला होता. परंतु वेल्हे पंचायत समितीमधील कॉंग्रेस सदस्यांच्या विरोधामुळे वर्षभरापूर्वी झालेल्या सभापती निवडीत आमदार संग्राम थोपटे यांचा आदेश पंचायत समिती सदस्यांनी डालवत पुन्हा कॉंग्रेस पक्षाचे दिनकर सरपाले यांना सभापतिपदी विराजमान केले होते. त्या वेळी दारवटकरांना डावलल्याची चर्चा तालुक्‍यात रंगली होती. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपसभापती सीमा राऊत यांनी राजीनामा दिल्याने दारवटकरांना उपसभापतिपद तरी मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली होती. यावर आज (ता. 21 जानेवारी) यावर चर्चा करण्यासाठी राजगड सहकारी साखर कारखान्यावर आमदार थोपटे यांच्यासह वेल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सभापती दिनकर सरपाले, राजगड कारखान्याचे संचालक संदीप नगिने, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना राऊत, माजी सभापती संगीता जेधे यांचे पती प्रकाश जेधे यांच्यामध्ये खलबते झाली. यामध्ये अनंत दारवटकर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतरच त्यांना उपसभापतिपद दिले जाईल, असे ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिला आहे. 

दरम्यान, कॉंग्रेस पक्षात जाऊन उपसभापतिपद स्वीकारायचे की नाही, याबाबतचा निर्णय रेवणनाथ दारवटकर आणि त्यांचा गट घेणार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे सर्व तालुक्‍याचे लक्ष असणार आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख