सोलापूरचे नेतृत्व करावे म्हणून संजय शिंदेंना खूप ताकद दिली; पण ते सर्व विसरले 

त्यांनी एकतर्फी निर्णय घेतले.
MLA Prashant Paricharak's explanation on MLA Sanjay Shinde's claim
MLA Prashant Paricharak's explanation on MLA Sanjay Shinde's claim

पंढरपूर  ः आमदार संजय शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करावे; म्हणून काही मंडळींसह तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो. त्यावेळी त्यांनी खूप मोठी ताकद दिली. परंतु दुर्देवाने संजय शिंदे विसरुन गेले. त्यांनी एकतर्फी निर्णय घेतले. राजकारणात काही लोक पदासाठी, सत्तेसाठी कहीही तडजोडी करतात. परंतु शिडीसारखा वापर करुन सोडून देण्याची आमची प्रवृत्ती नाही, त्यामुळे आम्ही ज्या पक्षाचे काम करतो, ते प्रामाणिकपणे करतो. त्याच निष्ठेने आठ-दहा वर्षांपासून कार्यकर्त्यांची ताकद भाजपच्या पाठीशी उभी केली आहे, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले.  

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार संजय शिंदे यांनी परिचारक आणि आमचे काय ठरले आहे, ते 17 तारखेनंतर कळेल अशा आशयाचे वक्तव्य केले. त्या संदर्भात परिचारक यांनी वरील स्पष्टीकरण दिले. 

आमदार होण्यापूर्वी संजय शिंदे यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अशी पदे मिळाली. त्यावेळी आमच्याबरोबर असलेल्या मंडळींसमवेत जे काही ठरले होते, त्यातील आमदार संजय शिंदे यांनी काहीच पाळले नाही. त्यामुळे आज शिंदे यांना ‘आमचं ठरलंय' असे सांगण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे पलटवार आमदार परिचारक यांनी संजय शिंदे यांच्यावर केला. 

ते म्हणाले की, आमचं आणि आमदार संजय शिंदे यांच्यासोबत काही ठरले असते तर त्यांना एवढ्या मोठ्या संख्येने मंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात आणावे लागले असते का. तुम्हा सर्वांना एवढी पळापळ करावी लागली असती का. ज्याच्याजवळ राहायचे, त्याचे काम प्रामाणिकपणे करायचे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही काम करत आहोत. त्यामुळे संजय शिंदे यांच्या विनाकारण संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा उपयोग होणार नाही. 

त्यांना तीन-तीनवेळा निवडून दिल्यानंतर कोणतीही विकासकामे झाली नाहीत. आश्वासनांची पूर्तता केली नाही. एखादी सहकारी सोसायटी किंवा छोटी शाळासुद्धा त्यांनी काढली नाही. नव्या संस्था काढणे तर सोडाच उलट जुन्या लोकांनी उभ्या केलेल्या चांगल्या संस्था मोडून खाण्याचे काम यांनी केले. त्यामुळे मतदारसंघातील जनता या निवडणुकीत निश्‍चितपणे समाधान आवताडे यांना बहुमताने निवडून देईल, असा विश्वासही परिचारक यांनी व्यक्त केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com