आमदार बबनदादा शिंदेंचा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट झाला अन्‌ निवडणूक लागली  - MLA Babandada Shinde's Vitthalrao Shinde Co-operative Sugar Factory converted into a multistate | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार बबनदादा शिंदेंचा सहकारी साखर कारखाना मल्टीस्टेट झाला अन्‌ निवडणूक लागली 

प्रमोद बोडके 
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

या कारखान्यासाठी एकूण 21 संचालक निवडले जाणार आहेत.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांचा पिंपळनेर (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे रूपांतर सहकारातून बहुराज्य सहकारी संस्थेत (मल्टीस्टेट) झाले आहे. त्यानंतर सोमवारी (ता. 1 फेब्रुवारी) या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी आज 2020-21 ते 2025-26 या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवड करण्यासाठी कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या 28 फेब्रुवारीला मतदान, तर 1 मार्च रोजी कारखान्याची निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. 

या कारखान्यासाठी एकूण 21 संचालक निवडले जाणार आहेत. त्यामध्ये उत्पादक सभासदांमधून 15, उत्पादक सभासदांमधून अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचा एक, ऊस उत्पादकांमधून महिला एक, सहकारी संस्था सभासदांमधून एक, उत्पादक सभासदांमधून भटक्‍या जमातीचा एक, उत्पादक सभासदांमधून इतर मागास वर्गातील एक आणि उत्पादक सभासदांमधून आर्थिक मागास वर्गातील एक असे 21 संचालक निवडले जाणार आहेत. 

कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध झाली आहे. येत्या 5 फेब्रुवारी दरम्यान कारखान्याच्या कार्यस्थळावर मतदार यादीवरील हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. हरकतींवर 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. येत्या 8 फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

ता. 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशन पत्राची विक्री व स्वीकृती होणार आहे. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 15 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजल्यापासून संपेपर्यंत कारखान्याच्या कार्यस्थळावर होणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 16 ते 20 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवाराने बहुराज्य सहकारी संस्था अधिनियम 2002 व संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीमधील पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. निवडणूक अनामत ठेव हजार रुपये इतकी असून अनामत रक्कम जमा केलेल्या बाबतची पावती नामनिर्देशन पत्रासोबत जोडणे आवश्‍यक आहे. या निवडणुकीत कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत सरकारने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाणार आहे. 
- कुंदन भोळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, सोलापूर 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख