zpचे माजी अध्यक्ष खोमणेंचे भगतांपुढे कडवे आव्हान; कोऱ्हाळ्यात राष्ट्रवादीचे चार गट निवडणूक रिंगणात 

कडवे विरोधक नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन किंवा त्या पेक्षा जास्त गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
In the Korhale Budruk Gram Panchayat elections, four groups of NCP will fight against each other
In the Korhale Budruk Gram Panchayat elections, four groups of NCP will fight against each other

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : बारामती तालुक्‍यातील 35 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे. पण, तालुक्‍यात कडवे विरोधक नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन किंवा त्या पेक्षा जास्त गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे पक्षीय चुरस नसली तरी राष्ट्रवादीतील विविध गटाकडून ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या कोऱ्हाळे बुद्रूकमध्ये राष्ट्रवादीतील दिग्गजांनी एकमेकांविरोधात दंड थोपटल्याने जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुनील भगत यांच्या सत्ताधारी पॅनेलला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या पॅनेलने कडवे आव्हान दिले आहे. पण, पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे आणि सोमेश्वर कारखान्याचे संचालक लालासाहेब माळशिकारे यांच्याही वेगवेगळ्या पॅनेलने निवडणुकीत चार रंग भरले आहेत. 

कोऱ्हाळे बुद्रूक गाव नेहमीच सोमेश्वर कारखान्याच्या, तालुक्‍याच्या व जिल्ह्याच्या सत्तेत राहिलेले आहे. सोमेश्वर कारखान्याचे पस्तीस वर्ष संचालक असलेले (स्व.) रामचंद्र भगत आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले सतीश खोमणे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते याच गावचे. सतीश खोमणे यांच्या नेतृत्वाखालील गावची सत्ता 2005 मध्ये (स्व.) रामचंद्र भगत यांच्या मार्गदर्शनाखाली लढून सुनील भगत यांनी मोडीत काढली होती. त्यानंतर 2010 मध्ये पुन्हा एकदा सतीश खोमणे यांच्या नेतृत्वावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवला. मात्र, 2015 मध्ये सुनील भगत यांनी पुन्हा सत्ता खेचून घेतली. आता मात्र पूर्वीसारखी दोन पॅनेलमधील समोरासमोरील लढत राहिलेली नाही. आताची लढत चौरंगी असल्याने भगत (तात्या), खोमणे (मामा), माळशिकारे (लाला) की धापटे (बापू) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल बाजी मारणार, हे सांगणे थोडे कठीण आहे. 

पंधरा जागांसाठी सुरू असलेल्या चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सतीश खोमणे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सुनील भगत यांच्या नेतृत्वाखालील श्री सिध्देश्वर ग्रामविकास पॅनेलला आव्हान दिले आहे. हे दोन पॅनेल समोरासमोर उभे ठाकणार, असे वाटत असतानाच सध्याचे पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप धापटे यांच्या नेतृत्वाखाली तरूणांनी परिवर्तनाचे आवाहन करत वेगळी वाट चोखाळली आहे. त्यांच्या श्री सिध्देश्वर बहुजन विकास पॅनेलने पंधरापैकी दहा जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तर सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान संचालक लालासाहेब माळशिकारे यांनी काळेश्वरी पॅनेलमार्फत आपल्या एका प्रभागापुरतेच तीन उमेदवार उभे करत निवडणुकीनंतरच्या संधीची वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. धापटे यांनी लालासाहेब माळशिकारे यांच्या प्रभागात उमेदवार टाकलेले नाहीत, तर प्रभाग तीन व चारमध्ये प्रत्येकी एक उमेदवार टाकलेला नाही. 

राजकीय आखाड्यात तालुक्‍यात, जिल्ह्यात एकाच पक्षाच्या झेंड्याखाली एकीने उतरणाऱ्या या चारही नेतृत्वांनी गावाच्या आखाड्यात मात्र एकमेकांविरूध्द शड्डू ठोकले आहेत. सत्तरी पार केलेले सतीशमामा मुरब्बी ठरतात की चाळीशी पार केलेले सुनीलतात्या आणि बापू वरचढ ठरतात की चाळीशीचे लाला किंगमेकर ठरतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

समोरासमोरच्या लढतीचा इतिहास असलेल्या गावकऱ्यांना नेतेमंडळींनी पेचात टाकले आहे. या लढतीला तिरंगी म्हणावे का चौरंगी असाही प्रश्न पडला आहे. या निवडणुकीत विकासाच्या बरोबरीने वाडा, बेट, भावकी, समाज असेही मुद्दे पुढे आल्याने सगळेच नेतेमंडळी कुठलाही अंदाज न लावता आटोकाट प्रयत्नांत आहेत. जिल्ह्यात, तालुक्‍यात सगळे असले तरी गावाचा नेता कोण? हे अठरा तारखेलाच स्पष्ट होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com