राजगुरुनगर (जि. पुणे) : सरपंचपदाच्या निवड एक दिवसावर येऊन ठेपली असतानाच ग्रामपंचायत सदस्य पळवापळवी सुरू झाली आहे. काही ठिकाणी त्याला हिंसक वळण लागत आहे.
खेड घाटातील एका हॉटेलमधून पारनेरच्या निघोज ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे रविवारी (ता. 7 फेब्रुवारी) मारहाण करत अपहरण करण्यात आले. त्याच दिवशी आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी ग्रामपंचायतीच्या एका महिला सदस्याचे राजगुरुनगर (ता. खेड) येथून चार नवनिर्वाचित सदस्यांनीच अपहरण केले. तसेच, खेड तालुक्यातील दोन ते तीन गावांत भांडणांच्या घटनाही घडल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील नवनिर्वाचित महिला सदस्य मंगल म्हातारबा गावडे यांचे त्यांच्याच ग्रामपंचायतीत निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य विजय धोंडिबा गावडे, विनायक ज्ञानेश्वर गावडे, प्रमोद सुखराज गावडे व महेंद्र नानाभाऊ गावडे यांनी अपहरण केल्याची तक्रार त्यांची मुलगी तेजल म्हातारबा गावडे हिने खेड पोलिस ठाण्यात दिली आहे.
मंगल गावडे या गावडेवाडीतून निवडून आल्या असल्या तरी, आपल्या कुटुंबासह राजगुरुनगर येथील वाडा रोडवरील, माळी मळा भागातील सोनतारा या इमारतीमध्ये राहतात. रविवारी सकाळी त्यांच्याकडे त्यांच्याच गावडेवाडी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले चार सदस्य आले. ते त्यांना देवदर्शनाला जाऊ, असे म्हणत होते. मात्र, मंगल गावडे यांनी त्यांना नकार दिला. थोड्या वेळाने त्यांनी 'तुमचे पती नाशिक येथे गेलेले आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला सोडतो,' असे सांगितले. त्यानंतर त्या त्यांच्याबरोबर गेल्या.
दरम्यान, फिर्यादी असलेल्या त्यांच्या मुलीने साडेअकराच्या सुमारास आई तुमच्याकडे येत असल्याचे फोन करून वडिलांना सांगितले. त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वडील राजगुरुनगर येथील घरी आले. परंतु त्यांच्यासोबत आई मंगल नव्हत्या. तसेच, त्यांचा फोनही लागत नव्हता; म्हणून त्यांची मुलगी तेजल हिने खेड पोलिस ठाण्यात वरील चौघांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

