नुसतं जॅकेट घालून कामं होत नाहीत : अजितदादांची हर्षवर्धन पाटलांवर टीका  - Just wearing a jacket doesn't work: Ajit Pawar's criticism of Harshvardhan Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

नुसतं जॅकेट घालून कामं होत नाहीत : अजितदादांची हर्षवर्धन पाटलांवर टीका 

डॉ. संदेश शहा 
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

त्यांचा हा स्वार्थी निर्णय जनतेला न आवडल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.

इंदापूर : केंद्रानंतर राज्यातही भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार म्हणून इंदापूर तालुक्‍यातील नेते भाजपमध्ये गेले. त्यांच्या अनेक संस्था बंद पडल्या, तर काही डबघाईला आल्या आहेत. नुसते जॅकेट घालून काम होत नाही, तर जमिनीवर पाय ठेवून काम करायचे असते. त्यांचा हा स्वार्थी निर्णय जनतेला न आवडल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला, अशी बोचरी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी सहकार मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता केली. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या इंदापूर विभागीय कार्यालय तसेच जुन्या पुणे सोलापूर महामार्गावरील बॅंकेच्या नूतन शाखेचे उदघाटन पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. 6 फेब्रुवारी) झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रेय भरणे हे होते. या वेळी त्यांनी केंद्र सरकारसह विरोधकांवर सडकून टीका केली. 

या वेळी व्यासपीठावर उपस्थित अशोक घोगरे यांच्याकडे पाहून तुम्ही सर्वांनी एकजुटीने काम केले असते, तर 
बारामतीप्रमाणे विरोधकाची अनामत रक्कम जप्त झाले असते, असे सूतोवाचही अजित पवारांनी केले. 

"सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे राजकारणात मंत्री म्हणून नवखे जरूर आहेत. मात्र, विकास कामांचा पाठपुरावा करण्याची चिकाटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे खेचून आणली आहेत. तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे काम असे करा की विरोधकांचे अस्तित्वच तालुक्‍यात रहाणार नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले. मात्र, पवारसाहेबांच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला बसणाऱ्या नेत्याने पक्षविरोधी काम केल्यामुळे वालचंदनगर ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आली नाही. इथून पुढे असे चालणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी शिवाजीराव खटकाळे यांना दिला. 

या वेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने व अभिजित तांबिले, जिल्हा बॅंकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष छाया पडसळकर, शहराध्यक्ष उमा इंगुले, बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय फडतरे, संचालक शिवाजीराव इजगुडे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, धनंजय बाब्रस, वसंत आरडे, विठ्ठल ननवरे उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख