जिंकणार कोण..? भरणे-पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या लागल्या पैजा! 

विधानसभेनंतर प्रथमच तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असल्याने या गावगाड्याच्या राजकारणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
Harshvardhan Patil-Dattatreya Bharane activists claim victory in Gram Panchayat elections in Indapur
Harshvardhan Patil-Dattatreya Bharane activists claim victory in Gram Panchayat elections in Indapur

शेटफळगढे (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यात 15 जानेवारी रोजी 57 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या आजी-माजी मंत्र्यांपैकी 18 जानेवारीला होणाऱ्या मतमोजणीतून कोणाच्या समर्थक गाव पुढाऱ्यांची सरशी होणार? याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. आजी-माजी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र शंभर टक्के विजयाचा दावा करत पैजा लावल्या जात आहेत. 

विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या कार्यकर्त्यांसाठी या भरणे आणि पाटील या आजी-माजी मंत्र्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातले होते. यासाठी हे दोन्ही नेते निवडणुकीच्या सर्व बाबतीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. त्यांच्याकडून आढावाही घेत होते. विधानसभेनंतर प्रथमच तालुक्‍यातील 57 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असल्याने या गावगाड्याच्या राजकारणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. 

राज्य निवडणूक आयोगाने तालुक्‍यातील 60 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली होती. त्यापैकी 3 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत 57 ग्रामपंचायतींतील 209 प्रभागात 557 ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी 1 हजार 395 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्याकरिता 15 जानेवारीला झालेल्या मतदानाच्या दिवशी तालुक्‍यातील 1 लाख 58 हजार 599 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 926 मतदारांनी (81.92 टक्के) आपला मतदानाचा हक्क बजावला होता. 

या मतदानातून तालुक्‍यातील मतदार या 57 ग्रामपंचायतीची सत्ता या आजी-माजी मंत्र्यांपैकी कोणाच्या समर्थकांच्या ताब्यात सर्वाधिक ग्रामपंचायती देतात. याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. याशिवाय या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य आगामी वर्षभराच्या काळात होणाऱ्या बाजार समितीसाठी ग्रामपंचायत प्रवर्गातून निवडून द्यावयाच्या 4 जागांसाठी मतदार म्हणून पात्र होणार आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेही या निकालाला महत्त्व आहे. तसेच, या निवडणुकीचा निकाल आगामी वर्षभरात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरही काही प्रमाणात होणार असल्याने या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे तालुक्‍याचे लक्ष लागले आहे. 

या ग्रामपंचायतींची विशेष उत्सुकता 

भिगवण, निमगाव केतकी, वालचंदनगर, सणसर, लासुर्णे या मोठ्या ग्रामपंचायतींच्या निकालाला तालुक्‍यातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीची सत्ता कोणाकडे जाणार? याची संपूर्ण तालुक्‍याला उत्सुकता लागली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com