निंबुतचे सरपंचपद 40 वर्षांनंतर प्रथमच सतीश काकडेंच्या हातून निसटले  - The group opposed to Satish Kakade will get the Sarpanch post of Nimbut for the first time | Politics Marathi News - Sarkarnama

निंबुतचे सरपंचपद 40 वर्षांनंतर प्रथमच सतीश काकडेंच्या हातून निसटले 

संतोष शेंडकर 
रविवार, 31 जानेवारी 2021

आरक्षण कायम राहिल्याने सतीश काकडे व प्रमोद काकडे या ज्येष्ठांच्या हातातून सरपंचपदाच्या चाव्या गौतम काकडे, महेश काकडे आदी नव्या पिढीकडे सुपूर्द झाल्या आहेत.

सोमेश्वरनगर (जि. पुणे)  : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या बहुचर्चित निंबुत (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण निघाले. त्यामुळे बहुमत पाठीशी असूनही सत्ताधारी काकडे गटाची पंचाईत झाली आहे, तर अनुसूचित जमातीचा एकमेव विजयी उमेदवार विरोधातील राष्ट्रवादी युवा नेत्यांच्या गटाकडे असल्याने सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादीच्याच पण काकडे विरोधातील युवा पिढीच्या हातात गेल्या आहेत.

या घडामोडींमुळे निंबुत गावच्या इतिहासात 40 वर्षांनंतर सतीश काकडे गटाच्या हातून सरपंचपद निसटले आहे. प्रथमच विरोधी गटाला सरपंचपदाची खुर्ची मिळणार आहे. 

तालुक्‍याचे वारे कुठेही फिरले तरी निंबुतमध्ये मात्र (स्व.) बाबालाल काकडे व त्यांचे वारसदार शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांच्याच नेतृत्वाखाली गावाची सत्ता कायम असायची. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सतीश काकडे आणि जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ पॅनेलने नऊ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले.

त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे युवा नेते गौतम काकडे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकडे, माजी उपसरपंच उदय काकडे, धैर्यशील काकडे, सुजित काकडे, शशिकांत काकडे आदींच्या सोमेश्वर परिवर्तन पॅनेलने कडवी लढत देत सहा जागा मिळविल्या. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, माजी संचालक बी. जी. काकडे, माजी उपाध्यक्ष दिलीप फरांदे आदींचे त्यांना मार्गदर्शन होते. 

निवडणूकीपूर्वी निंबुतचे सरपंचपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले होते. राज्य सरकारने हे आरक्षण रद्द केले होते, तरीही विचारपूर्वक दोन्ही गटांनी प्रभाग क्रमांक दोनमधून अनुसूचित जमातीच्या महिलांना रिंगणात उतरविले होते. यामध्ये भैरवनाथच्या माजी ग्रामपंचायत सदस्या कावेरी भोसले यांच्यावर सोमेश्वर पॅनेलच्या निर्मला संतोष काळे यांनी 34 मतांनी मात केली होती. हाच विजय सोमेश्वर परिवर्तन पॅनेलसाठी "सत्ता परिवर्तन' घडविणारा ठरला असून भैरवनाथचे "फासे' उलटे पडले आहेत. 

आरक्षणात बदल होणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अनेक तर्कवितर्कांनंतरही आरक्षण कायम राहिल्याने सतीश काकडे व प्रमोद काकडे या ज्येष्ठांच्या हातातून सरपंचपदाच्या चाव्या गौतम काकडे, महेश काकडे आदी नव्या पिढीकडे सुपूर्द झाल्या आहेत. बहुमतातून उपसरपंचपद भैरवनाथ पॅनेलला मिळणार आहे. 

नीरेची पुनरावृत्ती निंबूतमध्ये 

मागील निवडणुकीत निंबुतनजीक नीरा गावात राजेश काकडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला बारा जागांचे बहुमत मिळाले होते, तर चव्हाण गटाला पाच जागांवर यश मिळाले होते. मात्र, चव्हाण गटाकडून सरपंचपदाच्या अनुसूचित जमातीच्या महिला उमेदवार दिव्या पवार निवडून आल्या होत्या. त्यामुळे अल्पमतातील चव्हाण गटाकडेच पाच वर्ष सत्तेच्या चाव्या राहिल्या. आता तिच पुनरावृत्ती निंबुत गावात झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख