नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा ऐकून अंत्यसंस्काराची तयारी चालवलेल्या आजीने डोळे उघडले  - Grandmother opened her eyes when she heard the cries of relatives | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

नातेवाइकांनी फोडलेला हंबरडा ऐकून अंत्यसंस्काराची तयारी चालवलेल्या आजीने डोळे उघडले 

चिंतामणी क्षीरसागर 
मंगळवार, 11 मे 2021

त्यामुळे त्यांनी आजीला परत घरी नेण्याचा निर्णय घेतला. 

वडगाव निंबाळकर (जि. पुणे) : कोरोना (Corona) महामारीमुळे सगेसोयरे तर दूरच; पण पोटची मुलंही जवळ येत नसल्याचे सध्याचे सर्वसाधारण वातावरण आहे. संसर्गाच्या भीतीमुळे रक्ताची नातीही दुरावत चालली आहेत. अगदी वागणं बोलणंही अंतर राखूनच सुरू आहे. असेच अंतर राखून राहायला शिकवणाऱ्या या कोरोना महामारीमुळे एका आजीबाईंना (Grandmother) स्वतःचे मरण (Death) डोळ्याने पाहावे लागले. (Grandmother opened her eyes when she heard the cries of relatives)

कोरोनाची लागण झालेल्या आजीची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. शारीरिक हालचालही थंडावली होती, डोळेही उघडले जात नव्हते. त्यामुळे घरातील लोकांनी आजीचे निधन झाल्याचे समजून अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. पण, नातेवाईकांचा आक्रोश ऐकून आजीबाईंनी डोळे उघडले आणि सर्वांना आर्श्चायाचा धक्का बसला. कोरोनाच्या भीतीमुळे स्पर्श न केल्याने आजी जीवंत आहे की मृत्यू झाला, याबाबतची खात्री करता आली नाही. त्यातूनची ही घटना घडल्याचे बोलले जाते.  

हेही वाचा : आमदार लंकेंचे काम पाहून आली आर.आर.आबांची आठवण : पोपटराव पवारांकडून कौतुक

ही घटना पुणे जिल्ह्याच्या बारामती (Baramati) तालुक्यातील मुढाळे (Mudhale) येथे सोमवारी (ता. 10 मे) घडली आहे. सुमारे ७६ वर्षे वय असलेल्या आजीबाईंना कोरोनाची लागण झाल्याचे वीस दिवसांपूर्वी आढळून आले होते. त्यांच्यावर गृह विलगीकरणात उपचार सुरू होते. आजींचे वय जास्त असल्यामुळे प्रकृती उपचाराला म्हणावी तशी साथ देत नव्हती. वयोमनामुळे जादा हालचालही करता येत नव्हती. घरातील व्यक्तींचीही संसर्गाच्या धोक्यामुळे पंचायत झालेली. कारण, आजीबाईंची सेवा करण्यासाठी जवळ जावे प्रादुर्भाव होण्याचा धोका होता, त्यामुळे अंतर राखूनच त्यांच्याकडून आजीबाईंची सेवा सुरू होती.

आजीची प्रकृती गेल्या दोन दिवसांत मात्र अधिकच बिघडली. ती डोळेही उघडेनासी झाली, त्यामुळे कुटुंबांतील सदस्यांनी आजीला उपचारासाठी अखेर बारामतीला घेऊन जाण्याचे ठरविले. त्यानुसार गाडीतून बारामतीला नेतानाही आजीकडून कोणताही प्रतिसाद नाही की हालचाल नाही. बारामतीतील दवाखानेही अगोदरच फुल्ल झालेले, त्यामुळे अडमीट करण्यासाठी दवाखान्यात एकही बेड मिळाला नाही. त्या सर्व परिस्थितीत आजीबाई निपचित पडून राहिल्यामुळे घरातील लोकांना वाटले की आजीचा मृत्यू झाला असावा. त्यामुळे त्यांनी आजीला परत घरी नेण्याचा निर्णय घेतला. 

त्याचदरम्यान, त्यांनी पै, पाहुणे, नातेवाईक यांना फोन करून आजीचे निधन झाल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात गाडी गावातील घरी आली. आजी अगोदरच कोविडची पेशंट असल्यामुळे तिच्या जवळ कोणीही गेले नाही. कोविडबाधित असल्यामुळे आजीच्या अंत्यसंस्कराची तयारीही संबंधितांनी वेगाने सुरू केली. पण, आजूबाजूला घरातील लोकांची आणि नातेवाइकांची सुरू असलेली रडारड ऐकून आजीबाईंनी डोळे उघडले आणि सर्वांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. आजी जीवंत होत्या. अंतर राखून शिकविणाऱ्या या कोरोनामुळे आजीबाईंना मात्र आपल्या मृत्यूची तयारी उघड्या डोळ्यांनी पाहावी लागली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख