आजोबा, वडिलांनंतर सचिन चांदणेंनी केली उच्चांकी मताधिक्‍याची हॅट्‌ट्रीक !  - Grandfather, after father, Sachin Chandne did a hat trick of the highest number of votes! | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर म्हसवड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे

आजोबा, वडिलांनंतर सचिन चांदणेंनी केली उच्चांकी मताधिक्‍याची हॅट्‌ट्रीक ! 

डॉ. संदेश शहा 
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

चांदणे परिवाराने प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने निवडणूक लढवली आणि भरणे गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत देत इतिहास घडविला. 

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यात नुकतेच पार पडलेल्या 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 622 एवढ्या उच्चांकी मताधिक्‍याने विजयी होण्याचा बहुमान निमगाव केतकी येथील पहिलवान सचिन दत्तात्रेय चांदणे यांनी पटकविला. अनेक कुस्ती आखाडे गाजविणाऱ्या सचिन यांनी राजकीय आखाडाही गाजविला आहे. आजोबा, वडील यांच्यानंतर ग्रामपंचायतीला उच्चांकी मताधिक्‍याने निवडून येण्याची हॅट्‌ट्रीकही सचिन यांनी केली असून ते चांदणे कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील राजकीय प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. 

मागील तीन विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निमगाव केतकी गावाने मताधिक्‍य दिले होते. परंतु ग्रामपंचायतीच्या मागील दोन निवडणुकीत मात्र भरणे गटाच्या विरोधात सत्ता दिली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत निमगाव केतकी ग्रामस्थ काय करणार, याकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. यंदा चांदणे परिवाराने प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने निवडणूक लढवली आणि भरणे गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत देत इतिहास घडविला. 

सचिन चांदणे हे प्रभाग दोनमध्ये सर्वसाधारण जागेवर उभे होते. यात 2047 पैकी 1671 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील 1045 मते सचिन चांदणे यांना मिळाली. त्यांच्या विरोधातील उमेदवाराला केवळ 423, अपक्षाला 187 तर नोटाला 16 मते मिळाली. 

सचिन यांचे आजोबा (कै.) सदाशिव चांदणे हे 1970 च्या दशकात उच्चांकी मताने विजयी झाले होते. त्यानंतर सचिन यांचे वडिल तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय चांदणे हे एकदा अपक्ष व तीन वेळा उच्चांकी मताने विजय झाले होते, तर चुलते सुवर्णयुग ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे हेही एकदा विजयी झाले होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चांदणे यांचे सहा बंधूंचे तीस जणांचे आजही एकत्र कुटुंब आहे. 

गणेश यात्रेत योगदान देणाऱ्या या कुटुंबाने सामाजिक बांधिलकी केंद्रबिंदू मानून दुष्काळात जनावरांसाठी छावणी, दरवर्षी 150 गरजू मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेणे, गारपिठीत घरे उद्‌ध्वस्त झालेल्या 14 लोकांना पुण्यातील दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून आरसीसीची पक्की घरे बांधून देणे, दहावी-बारावी तसेच स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंताचा सत्कार आदी उपक्रम राबवले आहेत. 

चांदणे यांच्या विजयामुळे दशरथ डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसपुरस्कृत सुवर्णयुग ग्रामविकास पॅनेलने 17 पैकी 12 जागेवर विजय मिळवून सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख