विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत उभी फूट; पाटील परिवाराने फुंकले 'विठ्ठल'चे रणशिंग 

या नव्या उलथापालथीमुळे राजकीय समिकरणे बदली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.
Disagreements in Pandharpur NCP on the face of Assembly by-elections
Disagreements in Pandharpur NCP on the face of Assembly by-elections

पंढरपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुकाध्यक्षपदाच्या निवडीवरुन तालुक्‍यातील राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अध्यक्षपदावरून ऍड दीपक पवार यांची तडकाफडकी उचलबांगडी केल्यामुळे पक्षातील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तालुका अध्यक्षपदाची विजयसिंह देशमुख यांची केलेली निवड रद्द करण्यात यावी, अशी मागणी पक्षातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. 

दरम्यान, आगामी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूकही आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रित ताकदीनिशी लढवणार असल्याची घोषणा करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी "विठ्ठल'च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आगामी विधानसभा आणि विठ्ठल साखर कारखाना या दोन्ही निवडणुकींच्या तोंडावर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. तालुक्‍याच्या राजकारणातील या नव्या उलथापालथीमुळे राजकीय समिकरणे बदली जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 1 मार्च) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची विठ्ठल हॉस्पिटल येथे बैठक झाली. तीमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत, अप्रत्यक्ष भगिरथ भालकेंसह त्यांच्या समर्थकांवर टीकास्त्र सोडले. 

बैठकीला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अरुण आसबे, श्रीकांत शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा युवती अध्यक्ष श्रेया भोसले, ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष साधना राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बैठकीनंतर विठ्ठल कारखान्याचे संचालक युवराज पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी कॉंग्रेस पंढरपूर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीत राजकारण झाले आहे. प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करताना कोणालाही विश्वासात घेतले नाही. ही निवड बेकायदेशीर व चुकीची आहे. ती रद्द करावी अशी मागणी पक्षाचे निरीक्षक सुरेश घुले यांच्याकडे केली आहे.'' 

औदुंबरअण्णा पाटील, राजूबापू पाटील आणि वसंतराव काळे यांनी विठ्ठल कारखान्याचे हित पाहिले होते. परंतु अलिकडच्या काळात कारखान्याची अधोगती झाली. फायद्यात असलेला कारखाना आज सुमारे साडेपाचशे कोटी रुपये कर्जात आहे. कारखान्याची ही दयनीय अवस्था कोणी केली, याचा शोध घेण्याची गरज आहे. गेली दहा वर्षे मी संचालक मंडळात आहे. परंतु एकही गोष्ट आम्हा संचालकांना विश्वासात घेऊन केली नाही. ठरावीक लोकच निर्णय घेत होते. यावर्षीच्या गाळप हंगामातही कारखान्याचे योग्य व्यवस्थापन करता न आल्यामुळे समारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यावर केला. कारखान्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित करत, येत्या काळात विठ्ठलची निवडणूक ही प्रामाणिक लोकांना सोबत घेवून लढवली जाणार आहे. कोणाच्याही दवाबाला बळी पडणार नाही. शेतकऱ्याच्या हितासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला मी तयार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

युवराज पाटील यांनी विठ्ठल कारखाना व विधानसभा निवडणुकीसंदर्भात जी भूमिका घेतली आहे, त्यांच्या या भूमिकेबरोबर आम्ही सर्व कार्यकर्ते सोबत राहणार आहोत. काही लोक पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा लोकांविषयी आम्ही वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी सांगितले. 

मागील काही वर्षांत राष्ट्रवादीचे चांगले काम करुन देखील काही लोकांनी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आमच्या मागणीची वरिष्ठांनी दखल घेतल्याचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरुन राजकीय पडसाद उमटले आहेत. आगामी विधानसभा आणि विठ्ठल कारखाना या दोन्ही निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com