भाजपची झोप उडविणारे कल्याण काळे रमलेत शेतशिवारात - BJP leader Kalyan Kale inspects exportable vineyards in Barshi | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

भाजपची झोप उडविणारे कल्याण काळे रमलेत शेतशिवारात

शांतीलाल काशिद
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

त्यामागे विठ्ठल परिवार आणि भाजपपासून पडलेले अंतर यामुळे ते भाजपच्या व्यासपीठापासून दूर असल्याची चर्चा आहे.

मळेगाव (जि. सोलापूर) : पंढरपूरच्या राजकारणात ताकद राखून असलेले सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे सध्या कोठे आहेत, याची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची झोप उडविणारे कल्याण काळे हे सध्या शेतशिवरात रमले असून सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील महागाव येथील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन बागांची पाहणी करत आहेत.

पंढरपूर पोटनिवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल परिवाराचे नेते भगिरथ भालके निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याच परिवाराचे सदस्य असलेले पण लोकसभा निवडणुकीवेळी भाजपत गेलेले कल्याण काळे मात्र या पोटनिवडणुकीच्या धामधुमीपासून चार हात लांब आहेत. त्यामागे विठ्ठल परिवार आणि भाजपपासून पडलेले अंतर यामुळे ते भाजपच्या व्यासपीठापासून दूर असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा  ः प्रशांत परिचारकांनी सांगितले समाधान आवताडेंना पाठिंबा देण्यामागचे कारण 

पंढरपूर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रात काळे यांची भूमिका महत्वाची असते. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीबाबत मात्र कल्याण काळे यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. ते कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. वाढत्या उष्णतेबरोबर पंढरपूर विधानसभा मतदारसंघात नेतेमंडळीच्या बैठका, मतदारांच्या गाठी-भेटी, राजकीय सभा, आरोप-प्रत्यारोपाच्या फायरी यामुळे राजकीय ज्वर चांगलाच तापू लागला आहे. शा निर्णायक क्षणी कल्याण काळे यांनी भाजप व महाविकास आघाडी यांच्यापासून फारकत घेत कृषी क्षेत्राशी जवळीकता निर्माण केली आहे.

बाहेरगावी असलेल्या कल्याण काळे यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत बार्शी तालुक्यातील महागाव येथील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी विजयकुमार घोलप व विषमुक्त द्राक्ष उत्पादन घेणारे मळेगावचे बळवंत मुंढे यांच्या द्राक्ष शेतीला भेट दिली. महागाव, मळेगाव, हिंगणी, पिंपरी, बावी हा पट्टा दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महागावचे शेतकरी विजयकुमार घोलप यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पन्न घेत चीन, मलेशिया, थायलंड या देशांमध्ये एक्सपोर्ट करून लाखो रुपयांचे उत्पादन घेतले आहे. त्यांची एसएसएन वाणाची द्राक्षे बाहेरील देशांत निर्यात झाली आहेत. त्यासंबंधीची सखोल माहिती काळे यांनी या वेळी घेतली.

पंढरपूर विधानसभेची निवडणुक ऐन रंगात आलेली असताना काळे यांनी दाखविलेली अनुपस्थिती उमेदवारांच्या चेहऱ्यावरचा रंग उडवणारी आहे. त्यामुळे कल्याण काळे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांना साथ देऊन त्यांचे ‘समाधान’ करणार की राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधून अचूक टायमिंग साधणार, याकडे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. 

या वेळी अमोल झिंगे, विजयकुमार घोलप, बळवंत मुंढे, कल्याणराव घोलप, अमोल माळवदे, विशाल चापले व द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख