देवेंद्र फडणवीसांना पावसातील सभेची मोठी धास्ती : धनंजय मुंडे - Big threat to Devendra Fadnavis in rain sabha : Dhananjay Munde | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

देवेंद्र फडणवीसांना पावसातील सभेची मोठी धास्ती : धनंजय मुंडे

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

यापेक्षा वाईट आणि खालच्या स्तरावरील राजकारण असूच शकत नाही, हे या पोटनिवडणुकीत भाजपने दाखवून दिले आहे.

पंढरपूर  ः  ‘‘भारतनाना भालके भाषणात नेहमी म्हणायचे, ‘मी कच्चा गुरुचा चेला नाही.’ नानांचे ते भाषण आपण सर्वांनी ऐकले. पण, काल येथे येऊन गेलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऐकलं नसेल का. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा पावसात झाल्याचे त्यांना कोणीतरी सांगितले. पावसात कोणाचीही सभा झाली की त्याची धास्ती फडणवीस यांना एवढी बसते की ते बोलून जातात की आम्हाला पावसाची गरज लागत नाही,’’ अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची खिल्ली उडवली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांची पंढरपुरात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंके, उमेश पाटील, साईनाथ अभंगराव यांच्यासह मनेसे आणि महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

मुंडे म्हणाले की, आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांच्या जातीला गुढीपाडवा किती महत्वाचा आहे, हे आपल्याला वेगळे सांगायला नको. या सभेत बोलत असताना आजचा दिवस माझ्या जीवनात का यावा, असा प्रश्न मी पंढरीच्या पांडुरंगाला विचारला. दीड वर्षापूर्वी भारतनानांच्या प्रचाराच्या निमित्ताने कासेगावला आलो. माझ्या जीवनातील सर्वात अभूतपूर्व सभा नानांच्या उपस्थितीत झाली आणि त्या उपस्थित जनतेमधील विश्वास पाहिल्यानंतर मी नानांना म्हणालो होतो, भारतनाना तुम्ही हॅट्‌ट्रीक करणार आणि भारतनानांनी हॅट्‌ट्रीक  केली. पण, नाना सामना अर्धवट सोडून गेले. जेवढे दुःख भगिरथ भालके आणि कुटुंबांना झाले असेल तेवढेच दुःख मलाही झाले. कारण, नानांचे आणि माझेही तेच नाते होते. माझे वडील गेल्यानंतर कायम बीडमध्ये येऊन वडिलकीचा आधार देणारे भारतनाना होते, हे मी कधीही विसरू शकत नाही. भगिरथ मी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी नव्हे; तर आपल्यासाठी या मायबाप जनतेचा आशीर्वाद मागायला आलो आहे. 

भारतीय जनता पक्षाने राजकारण किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवले आहे, ते सांगतो आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या. जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिलेला एक नेता आपल्यातून अकाली जातो. त्याची पोटनिवडणूक लागल्यानंतर ज्याच्या मनात राजकारण करण्याचे पाप येते, यापेक्षा वाईट आणि खालच्या स्तरावरील राजकारण असूच शकत नाही, हे या पोटनिवडणुकीत भाजपने दाखवून दिले आहे, असा टोलाही मुंडे यांनी भाजपला लगावला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख