बहुमत नसतानाही कुंजीरवाडीच्या सरपंचपदाची निगडे गटाला लॉटरी; उपसरपंचपदासाठी चुरशीने मतदान  - Anju Gaikwad of Bharat Nigde group unopposed as Sarpanch of Kunjirwadi | Politics Marathi News - Sarkarnama

बहुमत नसतानाही कुंजीरवाडीच्या सरपंचपदाची निगडे गटाला लॉटरी; उपसरपंचपदासाठी चुरशीने मतदान 

जनार्दन दांडगे 
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

कैलास तुपे यांनी युवा नेते संग्राम मच्छिंद्र कोतवाल यांचा एक मताने पराभाव केला. 

लोणी काळभोर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंजू गुलाब गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुंजीरवाडीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने, ग्रामपंचायतीत बहुमत नसतानाही माजी उपसरपंच भरत निगडे यांच्या गटाला सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. 

उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे व संतोष कुंजीर यांच्या गटाचे कैलास प्रमोद तुपे यांनी नऊ विरुध्द आठ अशा फरकाने विजय मिळवला. कैलास तुपे यांनी युवा नेते संग्राम मच्छिंद्र कोतवाल यांचा एक मताने पराभाव केला. 

कुंजीरवाडी गावाचे सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सरपंच व उपसरपंचपदाची निवडणुक प्रक्रिया मंगळवारी (ता. 9 फेब्रुवारी) निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश गोपाळकृष्ण सराफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

यात सरपंच पदासाठी अंजू गायकवाड, हरेश गोठे यांचा उमेदवारी अर्ज आले होते. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारित वेळेत हरेश गोठे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यामुळे कुंजीरवाडीच्या सरपंचपदी अंजू गायकवाड यांची बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सराफ यांनी केली. 

दरम्यान, उपसरपंचपदासाठी मात्र कैलास प्रमोद तुपे, संग्राम मच्छिंद्र कोतवाल, अजय निवृत्ती कुंजीर, सागर यशवंत निगडे, चंद्रकांत बबन मेमाणे अशा पाच जणांनी उमेदवारी दाखल केले होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या निर्धारित वेळत अजय कुंजीर, सागर निगडे, चंद्रकांत मेमाणे यां तिघांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे कैलास तुपे व संग्राम कोतवाल या दोघांत उपसरपंचपदासाठी सरळ लढत झाली. यात कैलास तुपे यांना नऊ, तर संग्राम कोतवाल यांना आठ मते मिळाली. यामुळे तुपे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी सराफ यांनी केली. 

निवडणूक प्रक्रियेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. 

आरक्षणामुळे निगडे गटाला फायदा 

कुंजीरवाडी ग्रामपंचायतीचे सतरा सदस्य असून नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संदीप धुमाळ, माजी सरपंच सचिन तुपे व संतोष कुंजीर यांच्या गटाला नऊ जागा मिळाल्या होत्या. माजी उपसरपंच भरत निगडे, विकास निगडे यांच्या गटाला तीन, तर संग्राम कोतवाल यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या होत्या. गोरख घुले यांच्या गटाला एक जागा मिळाली होती. कुंजीरवाडीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव असताना, संदीप धुमाळ यांच्याकडे अनुसूचित जातीचा उमेदवार नसल्याने सरपंचपद निगडे गटाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. 

या वेळी कुंजीरवाडीचे माजी सरपंच चेतन तुपे, माजी सरपंच संतोष कुंजीर, संदीप धुमाळ, माजी उपसरपंच सुरेश कुंजीर, गोरख तुपे, स्वप्नील कुंजीर, भाऊसाहेब कुंजीर, पोलिस पाटील मिलिंद कुंजीर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख