अजितदादांनी शिवतारेंच्या पराभवाचा विडा उचलला अन्‌ माझा विजय निश्‍चित झाला  - Ajit Pawar took up the Vida of Shivtare's defeat and my victory was assured | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांनी शिवतारेंच्या पराभवाचा विडा उचलला अन्‌ माझा विजय निश्‍चित झाला 

श्रीकृष्ण नेवसे 
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पवार कुटुंबीयांवर अतिशय खालच्या थराला जाऊन सातत्याने टीका केली.

सासवड (जि. पुणे) : पुरंदर विधानसभेची गतवर्षी झालेली निवडणूक ही माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यातील व्यक्ती आणि वृत्तीविरुद्ध होती. अतिशय खालच्या थराला जाऊन शिवतारेंनी बारामतीवर म्हणजे पवार कुटुंबीयांवर सातत्याने टीका केली, त्याचाही परिणाम निवडणुकीत झाला. त्यातून अजित पवार यांनी मनात असलेल्या रागापोटी जशास तसे उत्तर देत शिवतारेंच्या पराभावाचा विडा उचलला. त्याचा मला निवडून येण्यात निश्‍चितच उपयोग झाला, अशी कबुली पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली. 

विधानसभा निवडणूक जिंकल्याच्या घटनेस वर्षपूर्ती झाल्याबद्दल आमदार संजय जगताप यांची मुलाखत "सरकारनामा'वर प्रसिद्ध झाली. त्यात जगताप यांनी वरील गोष्टीची कबुली दिली. 

आधीच्या लोकप्रतिनिधींबद्दल लोकांची तक्रार होती, असे तुमचे म्हणणे आहे. ती त्रुटी दूर करीत जनतेसाठी कशा प्रकारे काम करीत आहात. या प्रश्नावर आमदार जगताप म्हणाले, ""पुरंदर हवेली मतदारसंघ हा शहरी, निमशहरी व ग्रामीण असलेला आहे. त्यामुळे अनेक समस्या, प्रश्न यांचे स्वरूप वेगळे आहे. गुंजवणीचे पाणी, रोजगार आदी महत्त्वाचे प्रश्न आहेत.

फुरसुंगीपासून आंबेगावपर्यंतच्या भागात पिण्याच्या पाण्याचा व ड्रेनेजसह काही नागरी सुविधांचा प्रश्न आहे, तो सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. समस्यांचा डोंगर होता, मागे सोलूशन दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रश्न सोडविण्यासाठी कोविड-19 ची समस्या असताना उपाय योजना हाती घेतल्या आहेत. रस्ते विकासासाठी निधी आणला आहे. कोविडच्या काळात चांगले काम करता आले.'' 

तुम्ही निधी मिळतोय म्हणता, मग खेडचे आमदार दिलीप मोहिते म्हणतात फक्त बारामती व आंबेगावलाच निधी जातो, बाकी तालुके कोरडे राहतात. यावर जगताप म्हणाले, मला मतदारसंघाच्या विकासार्थ समाधानकारक निधी मिळतो. जेजुरी पर्यटन केंद्र मंजूर झाले. राष्ट्रीय महामार्गातील भूसंपादनास 650 कोटी मिळाले. मतदारसंघात दक्षिण पुणे नावाची मोठी पाणी योजना मार्गी लागतेय.

नगरपालिकेला निधी आणलाय. फक्त कोरोनाचे संकट असल्याने सध्या अधिकचा निधी मिळत नाही. पण मोहिते म्हणतात, तशी माझी स्थिती नाही. 

पुणे जिल्ह्यात कॉंग्रेसची परिस्थिती फार चांगली नाही. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची काही बांधणी वा नियोजन आहे का? याबाबत जगताप म्हणाले, "पुरंदरसह भोर-वेल्हे-मुळशीचे लोकप्रतिनिधी आमच्या पक्षाचे आहेत. लोणावळा, वडगाव मावळ येथे कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत. जिल्ह्यात बारामती वगळता बाकी तालुक्‍यात कॉंग्रेसला चांगले बळ आहे.'' 

निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये जाताना थांबविले नाही वा आता परत पक्षात येण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत का? किंवा त्यांच्या मुलीस अंकिता पाटील यांना जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य होण्यात तुम्ही आडकाठी आणली का?

यावर जगताप यांनी सांगितले की, "हर्षवर्धन पाटलांना पक्ष सोडण्याच्या विचारापासून थांबविण्याचा प्रदेश कॉंग्रेसकडून निश्‍चित प्रयत्न झाला. आता परत येण्याबाबतचा विषय श्रेष्ठींचा आहे. त्यांची पक्ष सोडण्याची कुणकुण लागल्यानेच कार्यकर्त्यांनी पद पाटलांच्या मुलीस न देता दुसऱ्या कॉंग्रेस सदस्यास संधी द्यावी, अशी मागणी केली होती. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख