अजित पवारांचे भाजप प्रेम कायम; दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे ट्वीट, मात्र तासाभरात डिलीट - Ajit Pawar Deleted Tweet about Deendayal Upadhyay | Politics Marathi News - Sarkarnama

अजित पवारांचे भाजप प्रेम कायम; दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे ट्वीट, मात्र तासाभरात डिलीट

गणेश कोरे
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले होते. पण काही वेळातच त्यांनी हे ट्वीट 'डिलीट' केले. त्यांनी हे ट्वीट डिलिट का केले, अशी चर्चा आता सोशल माध्यमांमधून सुरु झाली आहे

पुणे - राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांचे भाजपावरील प्रेम अजुनही कायम आहे. भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादनाचे ट्वीट पवार यांच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डल वरुन सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले होते. मात्र तासाभरातच हे ट्वीट डिलीट करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या ट्वीट बाबत समाजमाध्यमांवर मात्र चांगलीच चर्चा सुरु होती. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहिल्याचे ट्वीट मुख्यमंत्री कार्यालयाने केले आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सुत्रे जुळत असतानाच अचानक अजित पवार यांनी पहाटे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या राजकीय धक्क्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती. मात्र पवार यांचे हे बंड पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोडीत काढले.

भाजपाबरोबर औट घटकेचा संसार थाटल्यानंतर अजित पवार यांचे भाजपावरील प्रेम कायम असल्याचे दिसून येत आहे. आज भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादनाचे ट्वीट अजित पवार यांच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डल वरुन सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास करण्यात आले होते. मात्र अशा प्रकारचे ट्वीट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकाही नेत्याने करण्याची हिम्मत दाखवली नाही. किंवा तसे केलेही नाही. मात्र अजित पवार यांनी केलेले ट्वीट तासाभरातच डिलीट करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या ट्वीट बाबत समाजमाध्यमांवर मात्र चांगलीच चर्चा सुरु होती.

दरम्यान अयोध्येतील राम मंदिराबाबतही अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी ‘जय श्रीराम'चे द्वीट देखील चर्चेचा विषय ठरले होते. यामुळे अजित पवार यांचे आजचे ट्विट हे भाजपावरील प्रेम कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होते. पवार यांचे आजचे ट्वीट भविष्यातील दिशा आहे का? असा प्रश्‍नही आता राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते आपापसात विचारु लागले आहेत.

आता अजित पवार भाजपा मध्ये जाणार का?
काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ट्विटर द्वारे दिल्या होत्या. याचा संदर्भ घेत आढळराव भाजपाच्या वाटेवर अशा आशयाच्या एका बनावट बातमीचे पोस्टर समाजमाध्यमावर व्हायरल झाले होते. हे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी संभ्रम निर्माण करण्यासाठी व्हायरल केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. तर शिरुरचे खासदार अमोल कोल्हे चार आमदारांना वैतागुन भाजपामध्ये जाणार अशीही एक बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. आता अजित पवार यांनी दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या अभिवादनाच्या ट्वीट नंतर अजित पवार भाजपामध्ये जाणार का? असा प्रश्‍न शिवसैनिक विचारत आहेत.

Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख