ग्रामपंचायत निवडणुका शिरूरच्या मुळावर : तालुक्‍यात रोज कोरोनाच्या 40 रुग्णांची नोंद  - 40 corona patients registered daily in Shirur taluka | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणुका शिरूरच्या मुळावर : तालुक्‍यात रोज कोरोनाच्या 40 रुग्णांची नोंद 

नितीन बारवकर 
रविवार, 31 जानेवारी 2021

कोरोनाची धास्ती संपल्याच्या पार्श्वभूमीवर बेपर्वाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

शिरूर (जि. पुणे) : ग्रामपंचायत निवडणुकांसाठी झालेल्या बैठका, गर्दी जमवत केलेला प्रचार, विजयानंतर देहभान हरपून केलेला जल्लोष आणि सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून काढलेल्या विजयी मिरवणुका या बाबी शिरूर तालुक्‍याच्या मुळावर उठण्याची चिन्हे आहेत. कारण, ग्रामीण भागात कोरोनाचा पुन्हा झपाट्याने फैलाव होऊ लागला आहे.

गेली आठवडाभरापासून दररोज सरासरी चाळीस कोरोनाग्रस्त रूग्ण तालुक्‍यात आढळून येत आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी चाळीस टक्के रुग्ण एकट्या शिरूर तालुक्‍यातील असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून तालुक्‍यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. शिरूर शहराबरोबरच, तालुक्‍याच्या ग्रामीण भागातही ही व्याप्ती असल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे. सद्यस्थितीत तब्बल 350 कोरोनाबाधितांवर उपचार चालू आहेत. अनेक रूग्ण घरीच विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. कोरोनाची धास्ती संपल्याच्या पार्श्वभूमीवर बेपर्वाई मोठ्या प्रमाणात वाढली असून, कोरोनासदृष लक्षणे आढळूनही तपासणी करणे किंवा उपचार घेणे या बाबी टाळल्या जात असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

गेल्या दहा दिवसांपासून सरासरी चाळीस रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह येत असून, 26 जानेवारी व 28 जानेवारीला प्रत्येकी 51 रूग्ण आढळले होते. पुणे शहरात सरासरी शंभर रूग्ण आढळत असताना, शिरूर तालुक्‍यातील संख्या सर्वच संबंधित यंत्रणांची काळजी वाढवणारी आहे. 

सद्यस्थितीत कोरोनाची लाट काहीशी कमी झाली असली; तरी पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याचे चित्र आहे. शिरूर तालुक्‍यात आजअखेर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजार 18 झाली असून, पाच हजार 518 रूग्ण बरे झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डी. बी. मोरे यांनी दिली.

तालुक्‍यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 161 झाली असून, मृत्युदर घटला असला; तरी पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत चालल्याचे त्यांनी मान्य केले. तपासणी यंत्रणा वाढविली असल्याचे व पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांचे तातडीने विलगीकरण करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. 

या पार्श्वभूमीवर, खबरदारीची त्रिसूत्री कठोरपणे अंमलात आणण्याची गरज आरोग्य यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. 

रूग्णवाहिकेचे बिल थकले 

कोरोना तपासणी झाल्यानंतर रिपोर्ट यायला सद्या तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने या काळात बाधित रूग्ण विलगीकरण पाळत नसल्यानेही फैलाव होत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. शिरूर व मलठण येथे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला नेण्यासाठी रूग्णवाहिका नेमलेली आहे. मात्र, संबंधित खासगी रुग्णवाहिकेचे गेल्या मे महिन्यांपासून बील न दिल्याने त्याच्या सेवेतही सातत्य राहिले नसल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांकडून मिळाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख