ग्रामपंचायत सदस्यही मुख्यमंत्री होऊ शकतो, हे विलासराव देशमुखांनी दाखवून दिले  - Vilasrao Deshmukh showed that a Gram Panchayat member can also become the Chief Minister | Politics Marathi News - Sarkarnama

ग्रामपंचायत सदस्यही मुख्यमंत्री होऊ शकतो, हे विलासराव देशमुखांनी दाखवून दिले 

तानाजी झगडे 
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

त्याच धर्तीवर गावचा विकास झाल्यास खेडी स्वयंपूर्ण होतील.

जेजुरी (जि. पुणे) : "ग्रामपंचायतीचा सदस्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकतो, हे विलासराव देशमुख आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी दाखवून दिले आहे. लोकशाहीचा पाया ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीमध्ये काम करण्यास मोठी संधी असते, त्यासाठी अभ्यास केला पाहिजे आणि सामाजिक कामात वाहून घेतले पाहिजे,'' असा सल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना दिला. 

पुरंदर तालुक्‍यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा संभाजी ब्रिगेड पुरंदर शाखेच्या वतीने जेजुरी (ता. पुरंदर) येथे सत्कार करण्यात आला. त्या वेळी गायकवाड बोलत होते. या वेळी आमदार संजय जगताप, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त प्रसाद शिंदे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे, उद्योजक पांडुरंग सोनवणे, उद्योजक रवींद्र जोशी, सुधार गोडसे, जयदीप बारभाई, सचिन सोनवणे, मेहबूब पानसरे आदी उपस्थित होते. 

जिल्हा नियोजन मंडळावर निवड झाल्याबद्दल माणिकराव झेंडे, सामाजिक कार्यात पीएच. डी. मिळवल्याबद्दल राजकुमार लोढा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रोफेसर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. दिगंबर दुर्गाडे व सामाजिक कार्यक्रमात योगदान देणारे मेहबूब पानसरे यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. 

खेड्यापाड्याच्या विकासासाठी ग्रामपंचायतीचे कारभारी समाजसेवकाच्या भूमिकेत राहिले पाहिजेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पोपटराव पवार, भास्करराव पेरे पाटील यांनी समाजाला बरोबर घेऊन गावचा विकास केला. त्याच धर्तीवर गावचा विकास झाल्यास खेडी स्वयंपूर्ण होतील, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्‍यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख