अजितदादा, बारामतीत महिलांसाठी शौचालय नाही, हे आता सगळीकडे सांगणार : धस  - Ajitdada, i will tell everywhere that there are no toilets for women in Baramati: Dhas | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा, बारामतीत महिलांसाठी शौचालय नाही, हे आता सगळीकडे सांगणार : धस 

संतोष शेंडकर 
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

तुम्ही लय कडक शिस्तीचे. तुमाला गालबोट आवडत नाही. मग अजितदादा ही घाण तुमाला कशी आवडतीय?

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : "कारखान्यांवर साधं सार्वजनिक शौचालय नाही. आमच्या बायामाणसांना इज्जत आहे की नाही? उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महिलांना शौचालय नाही, हे आता मी सगळीकडे भाषणात सांगणार आहे.

अजितदादा, तुम्हाला आमची विनंती आहे. तुम्ही लय कडक शिस्तीचे. तुमाला गालबोट आवडत नाही. मग अजितदादा ही घाण तुमाला कशी आवडतीय?' असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर येऊन विचारला. तसेच, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी स्वच्छता पुरस्कार परत करावेत, असा हल्लाबोलही केला. 

ऊसतोड मजुरांच्या दरवाढीसाठीसह अन्य मागण्यांसाठी झालेल्या संपात या वर्षी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रकाश आंबेडकर, विनायक मेटे अशा अनेकांनी उडी घेतली होती. यामध्ये सुरेश धस यांनीही ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून या आंदोलनात स्थिरावण्याचा प्रयत्न केला. भाजपकडूनही जुन्या नेतृत्वाला शह देण्यासाठी धस यांचे "नवे नेतृत्व' ऊसतोड मजुरांमध्ये प्रस्थापित केले जात असल्याचे बोलले जात आहे. 

संपावरील तोडगा काढण्यासाठी "व्हीएसआय'मध्ये झालेल्या बैठकीत चौदा टक्के दरवाढ जाहीर करण्यात आली. त्या वेळी बैठकीत सुरेश धस यांना आधी प्रवेश नाकारला व नंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. बैठकीत झालेल्या करारावर धस यांनी सह्या केल्या नाहीत.

आता ही दरवाढ अत्यंत तोकडी असून 85 टक्के दरवाढ मिळाली पाहिजे; अन्यथा 1 जानेवारीपासून फडात कोयता बंद केला जाईल असा इशारा देत त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील वीस कारखान्यांवर जागर यात्रा काढली आहे. 

आमदार धस, ऊसतोड मजूर, मुकादम वाहतूकदार संघटनेचे सचिव सुखदेव सानप यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. 14 नोव्हेंबर) पुणे जिल्ह्यातील विघ्नहर, भीमाशंकर, पराग, घोडगंगा, साखरवाडी, सोमेश्वर, माळेगाव, भवानीनगर या कारखान्यांवर "जागर यात्रा' काढली. दरवाढीसह विविध प्रश्नांवर त्यांनी ऊसतोड मजुरांच्या सभांमध्ये हल्लाबोल केला. 

धस हे अजित पवार यांचे जुने कार्यकर्ते होते. पण ते आता भाजपवासी झाले आहेत. पण जुना दोस्ताना असतानाही धस यांनी आवर्जून पुणे जिल्ह्यापासून आपल्या आंदोलनाच्या तयारीला सुरवात केली आहे. महत्वाचे म्हणजे मजुरांमधून त्यांना उस्फूर्त पाठींबा मिळत असून वाजतगाजत त्यांचे स्वागत होत आहे. महिलांच्या प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना, तर दरवाढीच्या प्रश्नाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. 

कशाचं वैभव तुमचं?

"उघड्यावर आमची बायामाणसं बशीवता. कशाचं वैभव तुमचं? आरंरंरं...अजितदादा पवार यांच्या मतदारसंघातही शौचालये नाहीत. उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात असं असेल तर आम्हा गरिबांनी काय करायचं? त्यामुळंच अजितदादा कारखान्यांवर मोळी टाकायला येत नाहीत. आमची इतकी वाईट अवहेलना? आमच्या बायामाणसांना शौचालये का नाहीत, हे अजितदादा कारखानदारांना का विचारत नाहीत?' असा सवाल धस यांनी केला. 

जोडीचा कोयता तयार करण्यासाठी लेकरांची लवकर लग्न लावतात. वयात येण्याआधी पोरी दोन लेकरांच्या आया होतात. प्रसूतीच्या काळात मोळ्या वाहतात. यामुळेच तेरा हजार गर्भाशयाच्या पिशव्या काढल्या गेल्या, ह्याचं सरकारला वाईट वाटतं का नाही? असा सवालही त्यांनी केला. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मांडलंय. 

"साखरसंघातील तज्ज्ञांना वाटते, आम्हाला काही कळत नाही' 

आम्हाला चौदा टक्के दरवाढ संगनमताने दिली आहे. उद्धवसाहेबांनीच आता हस्तक्षेप करून 85 टक्के भाववाढ देऊन न्याय द्यावा, असे आवाहनही धस यांनी केले. ही दरवाढ कमी असल्याने ऊसतोड मजूर कमी संख्येने कारखान्यावर येतील, असे आपण पवारसाहेबांना सांगितले होते. आता सगळे कारखाने मजूर नाहीत म्हणून ओरड करत आहेत. साखरसंघातील तज्ज्ञांना वाटते आम्हाला काही कळत नाही. पण उसतोड्यांना पण सगळ्याचे बांध माहित आहेत, असा इशाराही धस यांनी दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख