अजितदादांनी पुण्यातील मर्जीतील अधिकारी बदलले : पालिका आयुक्त गायकवाडांकडे पुन्हा साखर - state govt transfers five IAS officers from Pune in immediate order | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांनी पुण्यातील मर्जीतील अधिकारी बदलले : पालिका आयुक्त गायकवाडांकडे पुन्हा साखर

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 11 जुलै 2020

विक्रमकुमार आता पुण्याचे नवीन पालिका आयुक्त 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पुण्यातील `लाडक्या` IAS अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी केलेल्या सूचना मान्य झाल्या आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार पुण्यातील महत्त्वाच्या पाच अधिकाऱ्यांच्या आदेश राज्य सरकारने आज सायंकाळी जारी केले.

त्यात पुण्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे बदली महत्त्वाची मानली जाते. त्यांना महापालिकेत येऊन काहीच महिने झाले होते. महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतरच त्यांची या पदावर बदली झाली होती. कोरोना संकटाच्या काळात आयुक्तांकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबाबत पालिकेचे कौतुक होत होते. त्यात सातत्य राखण्यासाठी गायकवाड यांची बदली होईल, असे कोणाला वाटत नव्हते. त्यात पुण्यात लाॅकडाऊन पुन्हा सोमवारपासून लागू होत असल्याने आहे त्याच अधिकाऱ्यांकडे जबाबदारी राहण्याची शक्यता व्यक्त होती.  तरी त्यांची बदली  त्यांनी आधी सांभाळलेल्या साखर आयुक्त पदावर झाली आहे.

 

पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे विक्रमकुमार यांची नियुक्ती झाली आहे. साखर आयुक्त असलेल्या सौरभ राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विशेषाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. विद्यमान विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर हे येत्या 30 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यानंतर राव यांच्याकडेच हे पद जाणार असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. 

 

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आलेले आहे. मंचरचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र दुडी यांची सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारि अधिकारी म्हणून बदली झालेली आहे. तेथे कडक शिस्तीचे अधिकारी असलेले चंद्रकांत गुडेवार यांची बदली यामुळे झाली आहे. गुडेवार यांच्या बदलीसाठी तेथील लोकप्रतिनिधींनी हट्ट धरला होता. गुडेवार यांनी मात्र अनेकांना सरळ करण्याचा पवित्रा घेतला होता. गुडेवार यांच्या बदलीचा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. 

पुण्याताली पाचही अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळे अजितदादांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. सौरभ राव हे पुण्याचे जिल्हाधिकारी, नंतर पालिका आयुक्त, साखर आयुक्त आणि आता विभागीय आयुक्त म्हणून पुण्यातच राहणार आहे. एकाच शहरात इतकी वर्षे काम करणाऱ्या मोजक्या अधिकाऱ्यांचे राव यांचाही समावेश होईल.    

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख