जाताना आणि आता पुन्हा येतानाही फटाक्यांची सलामी मिळणारा अधिकारी शिक्रापूरात - Police Inspector Umesh Tawaskar Took Chare of Shikrapur Police Station | Politics Marathi News - Sarkarnama

जाताना आणि आता पुन्हा येतानाही फटाक्यांची सलामी मिळणारा अधिकारी शिक्रापूरात

भरत पचंगे
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

सन २०१० मध्ये शिक्रापूरात आपला कार्यकाल गाजविलेल्या तावसकर यांच्या नियुक्तीने परिसरात अवैध व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारांनी धसका घेतल्याची चर्चा त्यांच्या आगमनाने लगेच सुरू झाल्याने त्यांचा आगामी कार्यकाल धडाकेबाज असणार हे नक्की.

शिक्रापूर : आपल्या पोलिसी कारवाईंनी जिथे जातील तिथे कार्यकाल गाजविणारे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी आज शिक्रापूर पोलिस स्टेशनचा पदभार स्विकारला. विशेष म्हणजे त्यांच्या आगमनाच्या वेळी फटाकेबाजी झाल्याने त्यांचे स्वागत जोरदार झाले.  

सन २०१० मध्ये शिक्रापूरात आपला कार्यकाल गाजविलेल्या तावसकर यांच्या नियुक्तीने परिसरात अवैध व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील गुन्हेगारांनी धसका घेतल्याची चर्चा त्यांच्या आगमनाने लगेच सुरू झाल्याने त्यांचा आगामी कार्यकाल धडाकेबाज असणार हे नक्की.

सन २०१० मध्ये इस्पात कंपनीतील पोलाद चोरी प्रकरण, बोगस शेअर मार्केट प्रकरण तसेच अवैध व्यवसायातील राजकीय व्यक्तींबाबतही तावसकर यांनी ठोस भूमिका घेवून कारवाया केल्या होत्या. त्यांच्या त्या कार्यकालाची आठवण आजही शिक्रापूरकर विसरलेले नाहीत. या शिवाय तावसकर यांनी हडपसर येथील आकाशवाणी पोलिस चौकी, चाकण पोलिस स्टेशन, चाकण महामार्ग वाहतूक तसेच सांगवी (पुणे) येथील वाहतूक नियंत्रण कक्ष येथेही आपली धडाकेबाज कारकिर्द गाजविली. त्यांच्या आक्रमक स्वभावाने ते जिथे कार्यरत राहतात तिथे ते हमखास चर्चेत राहतात. याच पार्श्वभूमीवर तावसकर यांनी आज सकाळी पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांचेकडून आपला कार्यभार स्विकारला.

दरम्यान त्यांच्या आगमनावेळी शिक्रापूर जोरदार फटाकेबाजी झाली. त्यांनी पाच वर्षांपूर्वी शिक्रापूर सोडले त्यावेळीही त्यांचे पश्चात बदली झाली म्हणून फटाके फोडले गेले होते. आता त्यांच्या आगमनावेळी पुन्हा फटाके फुटले असल्याने तावसकर कुणाकुणाचे कसे फटाके फोडतात आणि आपल्या पोलिसी कारवाईने कशी फटकेबाजी करतात त्याची उत्सूकता केवळ शिक्रापूरकरांनाच नव्हे तर संपूर्ण शिरुर तालुक्याला असणार हे नक्की. दरम्यान शिक्रापूर परिसरातील अवैध व्यवसाय व औद्योगिक गुंडगिरीच्या पार्श्वभूमिवर पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या नियुक्तीसाठी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी विशेष नियुक्ती केल्याची चर्चाही पोलिस खात्यात आहे. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख