अनेकांना धडकी भरविणारी पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची डायरी....

पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून प्रभावशाली काम करून के. व्यंकटेशम यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांची आता बदली झाली आहे.
K. Venkatesham.jpg
K. Venkatesham.jpg

टेबलावर एक डायरी...कोणी भेटायला आले की हाताची घडी घालून शांतपणे म्हणणे ऐकून घ्यायचे. महत्त्वाची गोष्ट लक्षात येताच त्याचे पॉइंट लगेच लिहून ठेवायचे. काम न झाल्याने तो व्यक्ती परत भेटायला आला की लगेच डायरीची पाने उलटून पाहायची. मग थेट संबंधित अधिकाऱ्याला फोन करून काम का झाले नाही, याची विचारणा करायचे आणि त्याची देखील नोंद ठेवायची. पत्रकाराने देखील सूचना केली किंवा तक्रार केली, तरी लगेच त्याची डायरीत नोंद करायची. त्यावर, "मैने सब लिखकर रखा है, सब काम होगा' असे सांगायचे...

पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून डॉ. के. व्यंकटेशम यांनी कल्पकतेने अनेक उपक्रम राबविले, सोशल मिडीयावर पुणे पोलिसांची `हवा` निर्माण केलीच, पण अत्यंत शांतपणे डोकेबाज काम करत पोलिस दलातील आणि बाहेरील रथी महारथींचा व्यंकटेशम यांनी गुन्हेगार, व्हाइट कॉलर गुन्हेगार, वसुलीदारांचा "व्यवस्थित' कार्यक्रम केला. त्यामुळे व्येंकटेशम यांच्या डायरीत चांगल्या वाईट लोकांच्या कुंडल्या दडलेल्या आहेत हे नक्की.

व्यंकटेशम यांची जुलै 2018 मध्ये नागपूरवरून पुण्यात पोलिस आयुक्त म्हणून बदल झाली. सुरवातीपासूनच भेटेल त्या व्यक्तीशी चर्चा करून माहिती मिळवणे ही त्यांच्या कामाची पद्धत. पुण्यात पूर्वी प्रत्येक महिन्याला एक क्राईम मीटिंग होत असत. व्यंकटेशन यांनी आल्या आल्या ही पद्धत बंद करून दर मंगळवारी सर्व पीआय, एसीपी, डीसीपी यांची बैठक घेण्यास सुरवात केली. त्याला ते टीआरएम (ट्यूजडे रिव्ह्यू मीटिंग) असे म्हणत. पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक अर्जाचे काय झाले, गुन्ह्याचा तपास कुठे आला, या आठवड्यात कोणत्या भागात कोणते गुन्हे वाढले, घटले याची माहिती घेत.

पोलखोल करणारी डायरी

बैठकीमध्ये त्यांनी डायरी उघडली की कोण खोटं बोलतोय, हे कळायचे. त्यामुळे अधिकाऱ्यांना बैठकीची फाइल व्यवस्थितच करावी लागे. डीसीपी, एसीपींनाही त्यांच्या स्तरावर बैठका घ्यायला लागल्याने सर्वांचेच काम मोठ्याप्रमाणात वाढले. त्यामुळे ही अधिकारी मंडळी वैतागून गेली होती. त्यामुळे पोलिस ठाण्यात अर्ज आला की त्याची दखल घ्यावी लागत होती, त्यातून अनेक सामान्य नागरिकांची कामे होऊ लागली. पोलिसांमध्ये "टीआरएम'बद्दल नाराजी असली तरी त्यांनी `इंपॅक्‍ट ऑफ टीआरएम' असा एक अहवाल तयार करून अर्ज संख्या, गुन्हे तपास, नव्या गुन्ह्यांची नोंदणी याचा आलेख सादर केला.

महिला, वृद्ध व लहान मुलांसाठी `भरोसा सेल` हा व्यंकटेशम यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट होता. पोलिस अधिकाऱ्यांचा विरोध आहे, हे माहिती असूनही त्यांनी स्वतंत्र इमारतीमध्ये हा विभाग सुरू केला. (बदली झाल्यावर आता बंद पडतो की सुरू राहतो हे महत्त्वाचे...) त्यासाठी वाहतूक पोलिसांचे कार्यालय येरवड्याला हलविले. भरोसा सेलमहून हजारो कुटुंबीयांना दिलासा मिळाला. घरातील कटकटी कमी झाल्या, लोकांचा संपर्क वाढला. पोलिस दलातील कर्मचारी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला वाचविणे, हलवलेले लहान मूल शोधून देणे, पैशाचे पाकीट, मोबाईल सह मौल्यवान दागिने अशी कामगिरी करत, पण त्याची दखल घेतली जात नव्हती, व्येंकटेशम यांनी अशा कामांची माहिती संकलित करण्यास सुरवात केली, त्याच्या बातम्याही वृत्तपत्रात चांगल्या पद्धतीने प्रकाशित होऊ लागल्या, त्यामुळे सामान्य पोलिस कर्मचाऱ्याचे उत्साह वाढलाच, पण पोलिसांची प्रतिमाही सुधारण्याचा प्रयत्न झाला.

`कलेक्टर` मंडळींना लावला चाप

एकीकडे हे काम केलेले असताना दुसरीकडे व्यंकटेशम यांनी एकदा प्रत्येक पोलिस ठाण्यातील `कलेक्‍टर`ची (उपहासाने त्यांना काही जण जिल्हाधिकारी ही म्हणतात) बैठक घेतली आणि सुधरा, असे सांगितले. त्यानंतर एक-दोन महिन्यात पोलिस ठाणे चालविणारे बरेच कलेक्‍टर साइड पोस्टिींगला पोलिस मुख्यालयात रुजू झाले. काही वाढीव काम करणारे, तर बडतर्फ झाले. ही सिस्टिम पूर्ण मोडून निघाली नाही, पण आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा झटका होता. अवैध धंदे बंद करण्यासाठीही शक्कल लढवली. क्राईम ब्रॅंचला अचानक कारवाईला पाठवले, पण यात ही तोडपाणी होत असल्याने रेकॉर्ड ठेवण्यास सुरवात केली. क्रीम पोस्टिंग असलेल्या सामाजिक सुरक्षा शाखेचे, क्राईम ब्रांचचे विचित्र प्रशासकीय बदल करून महत्त्व संपवले. त्याचे काही दुष्परिणामही झाले, पण खाबुगीरी काही प्रमाणात कमी झाली. व्येंकटेशम यांनी डोकेबाज पोलिसिंग केले. "किसी को घुस्से से बात कर के नाराज नही करने का?" असं ते म्हणत पण कारवाई करून हिसका दाखवत.

सध्या पुणे पोलिसांची ट्‌विटरवरही चलती आहे, पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या रुचकर ट्‌विटमुळे धमाल होत असतं. पोलिसांची फिरकी घेणाऱ्या लोकांनाही मराठी, इंग्रजीत मस्तपैकी उत्तर देणारी टीम व्येंकटेशम यांनी तयार केली. तेथे मदत मागणाऱ्यांना मदत तर मिळालीच, पण आगाऊपणा करणाऱ्यांना योग्य शब्दात समज देत. डिजिटल माध्यमावर पुणे पोलिसांचा हा स्मार्टपणा पसंतीस उतरला.

पोलिस आयुक्तालयाचा चेहरामोहरा बदलला

व्यंकटेशम यांचा एक चांगला निर्णय म्हणजे, त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांसाठी चांगली व्यवस्था केली. पूर्वी पोलिस आयुक्तांना भेटायला येणाऱ्या नागरिकांना पहिल्या मजज्यावर पॅसेजमध्ये, पायऱ्यांवर थांबावे लागत होते. ही असुविधा लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावरच कार्यालय हलवून तेथे एका मोठ्या हॉलमध्ये सोफा, टीव्ही वैगेरेची सोय करून नागरिकांसाठी व्यवस्था केली. त्यांचे अर्ज घेऊन म्हणणे ऐकून घेण्यासाठी दोन पीएसआय नेमले. त्यामुळे वैतागलेल्या लोकांचा राग अर्धा कमी होत असे. त्यानंतर ते स्वतः भेटून म्हणणे ऐकून घेत. सीपी ऑफिसच्या इमारतीत सुधारणा करून पोलिसांनाही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. गेले कित्येक वर्ष फक्त अधिकाऱ्यांच्या केबिनच फर्निचर बदलत, पण व्यंकटेशम यांनी सीपी ऑफिसच रूप पालटले.


व्यंकटेशम यांनी पोलिस दलातील आगाऊपणा करणारे, त्यांच्या सोबतच तथाकथित `पोलिस मित्र`, `समाजसेवक` यांचाही बंदोबस्त केला. मोठ्या थाटात फिरणाऱ्यांना आपले संस्थान कधी खालसा झाले, हे देखील कळले नाही. त्यामुळे गेळ्या एक ते दीड वर्षापासून हे लोक व्यंकटेशम यांच्या बदलीकडे डोळे लावून बसले होतेच. काही जणांनी तर पोलिस आयुक्तालयाकडे फिरकलेही बंद केले होते. आता आता व्यंकटेशम यांची बदली झाली आहे, त्यामुळे पुढच्या काळात अशीच व्यवस्था राहणार की पुन्हा ठराविक लोकांचे "अच्छे दिन' येणार हे पहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com