ठाण्याचे सलग तीनदा महापौरपद भूषवलेले अनंत तरे यांचे निधन  - Shiv Sena Deputy Leader Anant Tare passes away | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

ठाण्याचे सलग तीनदा महापौरपद भूषवलेले अनंत तरे यांचे निधन 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

त्यांना 2000 मध्ये विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती.

ठाणे : सलग तीनवेळा ठाण्याचे महापौर बनण्याचा बहुमान मिळालेले, शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत निष्ठावान असलेले शिवसैनिक, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचे वयाच्या 67 वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहीत मुली, दोन नातवंडे, लहान भाऊ असा परिवार आहे. 

अनंत तरे यांची मागील दोन महिने मृत्यूशी झुंज सुरू होती. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी (ता. 22 फेब्रुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

ठाणे महापालिकेच्या 1992 मध्ये झालेल्या निवडणुकीत अनंत तरे प्रथमच राबोडी या भागातून निवडून आले होते. त्यांनी प्रथम 31 मार्च 1993 रोजी ठाण्याचे महापौरपद भुषविले होते. त्यानंतर सलग 1994 आणि 95 मध्ये तीनवेळा त्यांनी महापौरपद भूषवून हॅट्ट्रिक साधली. त्यानंतर त्यांना 1998 आणि 1999 मध्ये दोन वेळा रायगडमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. तर 1997 मध्ये शिवसेनेत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या उपनेतेपदावर त्यांची वर्णी लागली होती. त्यांना 2000 मध्ये विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली होती. त्यानंतर 2006 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भास्कर जाधव यांच्याकडून त्यांच्या पराभव झाल्यानंतर त्यांची राजकीय पिछेहाट सुरू झाली. 

विधानसभेच्या 2014 मधील निवडणुकीत तरे यांनी कोपरी-पाचपांखाडी मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकवत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, अवघ्या 24 तासांत त्यांना मातोश्रीवर बोलवून घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी दूर केल्यावर त्यांनी उमेदवारी मागे घेतली होती. कार्ला येथील एकविरा देवी देवस्थानाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. 

शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे निधन वेदनादायी आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी ते होते आणि ठाण्यात शिवसेना रुजवण्यात त्यांचेही योगदान होते. महादेव कोळी समाजाला आपले न्याय्य हक्क मिळावेत, यासाठी त्यांनी प्रखर संघर्ष केला. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेना परिवार तरे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दांत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

एक लढवय्या, संघर्ष करणारा सैनिक, नेता आम्ही गमावला आहे. तळागाळातील गरीब व गरजू लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना ते सढळ हाताने मदत करीत होते. नवोदित शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन करुन वेळप्रसंगी त्यांना आर्थिक आधारही दिला. मुंबई, ठाणे या परिरातील मूळ रहिवासी असलेल्या कोळी समाजाला राजकीय पटलावर एकत्र करून कोळी समाजाची एकसंघ ताकद शिवसेनेशी जोडण्याचे काम अनंत तरे यांनी केले, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख