गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये घुमला 'इंग्लड टीम गो बॅक'चा नारा 

या सामन्यांच्या तयारीसाठी आलेले स्वच्छता कामगार घाबरून पळून गेले.
गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये घुमला 'इंग्लड टीम गो बॅक'चा नारा 
Youth of Kolhapur agitate in Mavla for Jagdamba sword

पिंपरी : इंग्लडच्या राणीच्या खजिन्यात असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा (भवानी) तलवार परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या पाच शिवभक्त तरुणांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात येऊन सोमवारी (ता.15) सायंकाळी आंदोलन केले. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये घुसून त्यांनी "इंग्लड टीम गो बॅक'च्या घोषणा देत ठिय्या दिला. 

गहुंजे स्टेडियमवर इंग्लडविरुद्ध क्रिकेट सामने होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर येथील शिवदुर्ग गड संरक्षणचे पाच कार्यकर्ते या स्टेडियममध्ये घुसले. लॉनवर त्यांनी भगवे झेंडे रोवून ठिय्या आंदोलन सुरू केले. या वेळी ते इंग्लड टीम "गो बॅक' अशा घोषणा देत होते. यामुळे या सामन्यांच्या तयारीसाठी आलेले स्वच्छता कामगार घाबरून पळून गेले. 

थोड्याच वेळाने पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी "आंदोलन का करत आहात,'' असे विचारले असता आंदोलक तरुण म्हणाले की, स्वराज्याचे चौथे अल्पवयीन छत्रपती गादीवर असताना इंग्लडचा तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स हा भारत भेटीवर आला होता. त्याला त्यावेळी जबरदस्तीने ही जगदंबा तलवार भेट देण्यात आली. ती परत भारतात यावी, अशी शिवभक्तांची इच्छा आहे. त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. 

कोरोना महामारीची साथ सुरू असताना हे आंदोलन केल्याने या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी साथरोग कायदा, आयपीसी (दंगल करणे कलम) आणि फौजदारी दुरुस्ती कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. त्यात हर्षल सुर्वे, प्रदीप हांडे, विजय दरवान, देवेंद्र सावंत आणि आशिष अष्टेकर या तरुणांना अटक करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी दत्ताजीराव मोहिते यांनी "सरकारनामा'ला दिली. साथरोग कायदा वगळता बाकीच्या दोन कायद्यान्वयेचा गुन्हा अजामीनपात्र आहे. 

हेही वाचा : सायबर हल्ल्याच्या आडून पाच कोटींचा विमा लाटण्याचा डाव 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पावर नुकत्याच झालेल्या सायबर हल्ल्यातून ५ कोटी रुपयांची विमा रक्कम लाटण्याचा डाव असल्याचा आरोप नगरसेविका सिमा सावळे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी सर्व्हरवर २६ फेब्रुवारीला सायबर हल्ला झाला होता. या घटनेप्रकरणी ८ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात टेक महिंद्रा कंपनीने पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. मात्र, ते कसे झाले त्याबाबत तीन आठवड्यात समाधानकारक खुलासा कंपनीला करता आलेला नाही. त्यामुळे नुकसानीच्या रकमेचा विमा लाटण्याचा कंपनीचा डाव आहे, असा आरोप सावळे यांनी केला आहे.

हे सर्व प्रकरण खूपच गोलमाल असून त्यात कुठेतरी पाणी मुरते आहे, असे त्यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे विमा लाटण्याचा हा बनाव नाही ना याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे पत्राव्दारे केली आहे. त्यात त्या म्हणाल्या की स्मार्ट सिटी प्रकल्प सांभाळणार्‍या टेक महिंद्रा कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पातील सर्व्हर  खंडणीच्या हल्ल्याचा बळी पडले आहेत. 

तक्रारीनुसार हल्लेखोरांनी बिटकॉइन्समध्ये खंडणी द्यावी, अशी मागणी केली आहे. तर, या हल्यात कोणतेही नुकसान झालेले नाही, असा दावा पालिकेने केला आहे. अशा स्थितीत कंपनीने पाच कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज नेमका कोणत्या आधारावर केला, त्याची वांरवार मागणी करूनही खुलासा झालेला नाही. अशा स्थितीत नुकसानीचा हा दावा फोल वाटतो आहे. 

निव्वळ विमा लाटण्यासाठीच तो केला असावा, असा दाट संशय आहे. म्हणून सायबर हल्ल्यानंतरचा हा बनाव आहे. धक्कादायक प्रकार त्यात पालिका प्रशासन कंपनीला उघडउघड पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकूणच स्मार्ट सिटीच्या कारभाराबाबत संशयाचे धुके निर्माण झाले आहे. स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ या प्रकरणावर कंपनीचीच वकिली करीत आहे, हे, तर आणखी धक्कादायक आणि संशयास्पद असल्याचे साळवे म्हणाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in