स्वबळाऐवजी आघाडीची भाषा राऊत पिंपरीत करणार? - Will Raut use Pimpri instead of self-reliance? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

स्वबळाऐवजी आघाडीची भाषा राऊत पिंपरीत करणार?

उत्तम कुटे
गुरुवार, 8 जुलै 2021

गेल्या महिन्याच्या दौऱ्यात त्यांनी एकीकडे पुण्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडीचे संकेत दिले. त्याचवेळी  त्यांनी खेडमध्ये राष्ट्रवादीचेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती.

पिंपरीः सात महिन्यावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे उद्या पिंपरी-चिंचवडला येत असून, ते यावेळी शिवसैनिकांना आघा़डीचा डोस देण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात पुण्यातही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडीचे संकेत दिले आहेत. ती झाली, तर पु्णे पालिकेत ८० जागा लढवू, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. त्यामुळे पिंपरी पालिकेत ते किती जागा लढविण्याची घोषणा करतात, याकडे आता स्थानिक शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Will Raut use Pimpri instead of self-reliance?)

गेल्या महिन्याच्या दौऱ्यात त्यांनी एकीकडे पुण्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडीचे संकेत दिले. त्याचवेळी  त्यांनी खेडमध्ये राष्ट्रवादीचेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. खेडच्या शिवसेना सभापतीवर अविश्वास ठराव आणल्याने भडकलेल्या राऊतांनी थेट मोहितेंना आव्हान दिले होते. मात्र, तशी स्थिती पिंपरी-चिंचवडमध्ये नसल्याने तेथील वक्तव्याची पुनरावृत्ती इथे ते करण्याची शक्यता नाही. कारण, दर पंचवार्षिकगणिक पक्षाची ताकद शहरात कमी होत चालली आहे.

२०१४ ला शहरात पक्षाचे दोन खासदार व एक आमदार होता. २०१९ ला फक्त एकच खासदार राहिला आहे. महापालिकेतील नगरसेवकांचे संख्याबळही २०१२ पेक्षा २०१७ ला कमी होऊन ते नऊ वर आले आहे. त्यामुळे ते वाढविण्यासाठी आघाडीशिवाय शिवसेनेला पर्याय नाही. त्यामुळे स्वबळाची भाषा पिंपरीत,तरी त्यांच्या हिताची नाही. त्यामुळे त्याअनुषंगानेच खासदार राऊत बोलतील, असा कयास आहे. फक्त शहरात पक्ष दोन गटात विभागले गेल्यावरून ते कान टोचतील, असे दिसते. शहरात अजित पवार आल्यानंतर जसे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे सर्व गट नेते झाडून त्यावेळी एकत्र येतात व नंतर पुन्हा त्यांची पांगापांग होते, तसे राऊत यांच्याबाबतीतही घडते आहे.

पक्षप्रमुख उ्द्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे पश्चिम आणि पश्चिम उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख असलेले राऊत हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उद्या ते पिंपरी-चिंचवडमध्ये शहरातील पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मतदारसंघनिहाय स्वतंत्र बैठका घेणार आहेत. त्यातून ते पालिका निवडणुक तयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शन करतील. या वेळी पालिकेत रिक्त असलेल्या गटनेतेपदाविषयीही चर्चा होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर ते नावही निश्चीत होईल, असा अंदाज आहे.

 

हेही वाचा..

या खासदारांना मंत्रीपदाची हुलकावणी

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख