पिंपरी-चिंचवड पालिकेच्या नवीन आयुक्तांची चर्चा : सूरज मांढरे की रुबल अगरवाल?

नवीन वर्षात प्रशासकीय बदलांची शक्यता....
पिंपरी-चिंचवड पालिकेच्या नवीन आयुक्तांची चर्चा : सूरज मांढरे की रुबल अगरवाल?
suraj-mandhare-rubal-agarwal

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची लवकरच बदली होणार असून त्यांच्या जागेवर येण्यास नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांच्या नावाची चर्चा आहे. या दोघांशिवाय अकोला येथील राज्य बियाणे महामंडळाचे अध्यक्ष जी. श्रीकांत व औरंगाबाद महाापलिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांडे यांच्या नावाचादेखील विचार होऊ शकतो, असे राज्य सरकारमधील प्रशासकीय सूत्रांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितले.

श्रीकांत यांची लातूर येथून अकोला येथे काही दिवसांपूर्वी तडकाफडकी बदली करण्यात आली. मांढरे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील आहेत. यापूर्वी त्यांनी पुण्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी म्हणून काम केले आहे. रूबल अगरवाल या गेल्या दोन वर्षांपासून पुण्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करीत आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी सक्षमपणे काम केले आहे.

पुण्यात काम करण्याची राज्यातील सर्वच आधिकाऱ्यांची इच्छा असते. मात्र, प्रत्येकाला संधी मिळत नाही. हर्डीकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार आहे. पुढील वर्षी महापालिकेच्या निवडणुका असल्याने उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतला आधिकारी या ठिकाणी नेमला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे चर्तेत असलेल्या नावांशिवाय अन्य नावदेखील अचानकपणे पुढे येऊ शकते असे या सूत्रांनी सांगितले.

पुणे महापालिकेत विक्रमकुमार यांची नियुक्ती पालकमंत्री पवार यांच्याच पसंतीने झाली आहे. पिंपरीत त्यांच्याच पसंतीचे आयुक्त येणार असल्याने ते कुणाची वर्णी लावणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. मुंबईनंतर पुणे ही राज्यकीयदृष्ट्या राज्यात महत्वाची महापालिका मानण्यात येते. पिंपरी महापालिकादेखील औद्योगिकदृष्ट्या महत्वाची आहे. त्यामुळे या दोन्ही महाापलिकेत एकाचवेळी राष्ट्रवादीचा झेंडा फडकावण्याची तयारी पवार करीत आहेत.

गेल्यावर्षी सत्तेत आल्यापासून पुणे आणि पिरपी-चिंचवड महापालिका ताब्यात घेण्यासाठी पालकमंत्री पवार यांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. पुण्यातील भाजपाच्या काही नगरसेवकांची निवडणुकीआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे नियोजन केले आहे. पिंपरीतही अशीच परिस्थिती आहे. दोन्ही महापालिकांत गेल्यावेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी पक्षांतर करून भाजपाकडून उमेदवारी मिळवत नगरसेवक झाले होते. यावेळी पुन्हा स्वगृही येण्याची तयारी काहीजणांकडून सुरू आहे. पालकमंत्री पवार यांच्याकडून या दोन्ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी मोठी तयारी सुरू असून त्यासाठी पक्षाच्यावतीने यंत्रणा तयारी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in