पिंपरी : कॉंग्रेसला नाना पटोले हे नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले. मात्र, पिंपरी-चिंचवडला तीन महिन्यानंतरही नवा अध्यक्ष मिळालेला नाही. गेल्यावर्षी ११ नोव्हेंबरला शहराध्यक्ष सचिन साठे यांनी दिलेला राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे नवा अध्यक्षही नाही. परिणामी शहरातील पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारीही संभ्रमात आहेत. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक वर्षभरावर आल्याने आता, तरी काय तो निर्णय घ्या, अशी निर्वाणीची भाषा शहरातील कॉंग्रेस कार्यकर्ते बोलू लागले आहेत.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्याजागी पटोले आल्याने शहरातील अध्यक्षपदाचा तिढा आता लवकर सुटेल, अशी आशा शहरातील कॉंग्रेसच्या एका गटाला वाटू लागली आहे. प्रा. रामकृष्ण मोरेंच्या काळात शहरात सुगीचे दिवस असलेल्या कॉंग्रेसचे अस्तित्वच सध्या पणाला लागल्यासारखी स्थिती आहे. शहरात पक्षाचा आमदार सोडा, एक नगरसेवकही नाही. होते ते सर्व गत पालिका निवडणुकीला पक्षाला सोडून गेले. त्यात विधानपरिषदेसाठी इच्छूक असलेल्या साठेंनी २५ वर्षे निस्सीम सेवा केल्यानंतरही डावलले गेल्याने आपली दुसरी टर्म पूर्ण होण्यापूर्वीच तडकाफडकी राजीनामा दिला.
त्यानंतर शहरातील पाच पदाधिकाऱ्यांनीही पक्षश्रेष्ठींवर आरोप करीत सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे अगोदरच तोळामासा प्रकृती झालेल्या कॉंग्रेसची स्थिती आणखीच वाईट झाली आहे. मात्र, त्यांचे राजीनामे तीन महिने होऊनही अद्याप स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे नवा अध्यक्षही नाही. अशी पक्षाची शहरात दुहेरी कोंडी झाल्याने सच्चा कॉंग्रेस कार्यकर्ता, मात्र अस्वस्थ आहे. शहरात पक्ष जिवंत रहावा म्हणून, तरी पक्षाने शहराला कॅप्टन द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
दुसरीकडे शिवसेना दोन महिन्यांपासून पालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. एकट्याने लढण्याचीही तयारी त्यांनी सुरु केली आहे. दुसरीकडे कॉंग्रेसला अध्यक्षही तीन महिन्यांपासून न मिळाल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता प्रचंड अस्वस्थ आहे.
साठे, मात्र संधी न मिळाल्याने राजीनाम्यावर ठाम आहेत. तर, त्यांच्या समर्थनार्थ राजीनामे दिलेल्या पाच पदाधिकाऱ्यांनी साठे यांना संधी देण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे साठेंचा राजीनामा न स्वीकारताच शहराध्यक्षपदासाठी मुलाखतीचा फार्सही कॉंग्रेसने २४ नोव्हेंबर रोजी घेतल्या. १६ जणांनी त्या दिल्या आहेत. ते ही आपल्याला संधी मिळेल, या आशेत आहेत. एकूणच शहर कॉंग्रेसबाबत पक्षश्रेष्ठी संभ्रमात व व्दिधा मनस्थितीत असून त्याचा फटका, मात्र शहरात पक्षाला बसत असल्याने सामान्य कार्यकर्ता संतप्त आहे.
Edited By - Amol Jaybhaye

