भ्रष्टाचाराने बरबटलेली पालिकेतील भाजपची सत्ता बरखास्त करा! 

कोरोनाच्या नावाखाली भाजपने पालिका अक्षरश लुटून खाल्ली आहे.
 Anna Bansode, Vilas Lande .jpg
Anna Bansode, Vilas Lande .jpg

पिंपरी : भाजप सत्ताधारी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे हे लाचखोरीच्या गुन्ह्यात बुधवारी (ता. १८ ऑगस्ट) पकडले गेल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आयतेच कोलित मिळाले. पहिला हल्लाबोल नेहमीप्रमाणे भोसरीतून झाला. भ्रष्टाचाराने बरबटलेली पालिकेतील भाजपची सत्ता बरखास्त करून तेथे प्रशासक नेमण्याची मागणी भोसरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे (Vilas Lande) यांनी केली. तर, कधी नव्हे, ते शहरातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांनीही महानगरपालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचे सांगितले. यामुळे ना खाऊंगा ना खाने दुंगा ही घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा उघड झाल्याने नैतिकता म्हणून त्यांच्या नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Vilas Lande criticizes BJP) 

करदात्यांच्या पैशांवर दिवसाढवळ्या टाकलेला हा दरोडा आहे, अशी घणाघाती टीका लांडेंनी या लाचखोरीवर केली आहे. त्यातून सत्ताधा-यांच्या सामुदायीक भ्रष्टाचाराचा बुरखा फाटला आहे. गेल्या साडेचार वर्षात त्यांनी केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच केला. त्यामुळे भ्रष्टाचाराने बरबटलेली ही सत्ता त्वरीत बरखास्त करून सर्वच विभागाशी संबंधीत पदाधिका-यांची सखोल चौकशी करावी. जोपर्यंत ती पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत पालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी लांडे यांनी केली आहे. 

आगामी महापालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर आल्याने सत्ताधा-यांना भ्रष्ट पैसा जमा करण्याची हाव सुटली आहे. त्यासाठी वाट्टेल त्या पध्दतीने निविदा राबविल्या जात आहेत. मर्जीतील व नातेवाईक असलेल्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी रिंग करून निविदा भरली जात आहे. लाखो रुपयांची कामे थेट पध्दतीने दिली जात आहे. यापूर्वी बनावट एफडीआर प्रकरणात देखील पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असलेल्या ठेकेदारांचा हात आहे. त्यांना वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांवर दबाव आणून बनावट ‘एफडीआर’चे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. 

सुमारे तीन लाखांची लाच आपल्या बॅंक खात्यावर जमा करून घेताना वैद्यकीय विभागातील अधिकारी रंगेहाथ सापडला. तरीही, आयुक्तांनी त्याच्यावर कारवाई केली नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत. त्याची देखील चौकशी झाली पाहिजे. कोरोनाच्या नावाखाली भाजपने पालिका अक्षरश लुटून खाल्ली आहे. अधिकारी, नगरसेवकांच्या भागीदारीत कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बिले काढण्यात आली.असेच चालू राहिले तर पुढील सहा महिन्यात भ्रष्ट पदाधिकारी पालिकेची तिजोरी रिकामी करतील,अशी भीती लांडे यांनी व्यक्त केली आहे.

पालिकेच्या इतिहासातील हा काळा दिवस असून ना खाऊंगा ना खाने दुंगा ही घोषणा देऊन सत्तेत आलेल्या भाजपचा खरा चेहरा काल  उघड झाला.त्यामुळे  थोडी,जरी नैतिकता शिल्लक असेल तर भाजप नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावेत,अशी मागणी आमदार बनसोडे यांनी या बड्या लाचखोरीनंतर केली आहे. या प्रकाराची सखोल चौकशीची मागणी राज्य  सरकारकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यामागे नेमका कुणाचा हात  आहे व होता हे ही शोधणे गरजेचे असून त्याचे धागेदोरे राज्यातील बड्या नेत्यांपर्यंत असू शकतात,असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. घोषणांचा पाऊस पाडून सत्तेत आलेल्या भाजपने पदाचा गैरवापर करून शहरातील जनतेच्या पैशाची जी लूट चालवली होती याचा पुरावा कालच्या लाचखोरीने शहरवासियांना मिळाला आहे. त्यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचे यातून  लक्षात आले आहे,असेही ते म्हणाले.    Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com